• Sun. Mar 15th, 2026
    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं कुणबी आरक्षणासाठी मराठा समाजाला आवाहन, आमदारांना जाब विचारण्याची सूचना

    मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रावरुन आमदारांना आणि मराठा समाजाला आवाहन केलं आहे. त्यांनी कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही? याबाबत जाब विचारण्याच आवाहन केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावेळी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडल्यास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला होता. पण जीआरनुसार प्रमाणपत्र दिलं जात नाही, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. “गोर गरिबांनी तुम्हाला मतदान करुन तुमचा सन्मान वाढवला आहे. तुमच्या सरकारने मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा जीआर काढला आहे. या जीआरप्रमाणे कुणबी प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत? असा जाब विचारण्याची गरज आमदारांना आहे. आमदार, खासदार, तहसीलदार अशा सर्वांना याबाबत जाब विचारला पाहिजे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

    “जीआर काढल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा. कारण हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील सर्व मराठा समाज हा कुणबी आहे. जीआर काढला तर मग हे विचारायचं कुणी? आमदारांनी केवळ आमची मतंच घ्यायची का? आमच्या पोरांचे शिक्षण आहे, नोकर भरती आहेत, आमदार काय करत आहेत? आतातरी महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करावी. आमचा गोरगरिब मतदार आहे. त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. ते त्यांना द्या, असं आमदारांनी बोलायचा हवं”, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

    “मराठवाड्यातील सर्व पक्षाच्या आमदारांनी म्हटलं पाहिजे की, हे गोरगरिब मराठे आमचे आहेत. त्यांची लेकरं मोठी व्हावेत. त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्या, असं आमदारांनी आवाहन करावं. आमदारांनी असं सांगितलं नाही तर 2019 च्या निवडणुकीत सर्व आमदारांना मराठा समाज पाडून टाकणार आहे. मराठ्यांचा रोष त्यांच्यावर ओढावेल. मराठा समाजाच्या नागरिकांना आपापल्या आमदारांना याबाबत विचारावं”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

    “आपली सुद्धा समाजाची जबाबदारी आहे. मी इतका टोकाचं लढतोय, समाजावर कुठलंही संकट आलं तर रात्रीसुद्धा धावून जातोय. त्यामुळे समाजाने सुद्धा बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. उलट हे मलाच संपवायला निघाले आहेत. सरकारमधील काही, काही विरोधातील, काही आपलेच, काही दुसरेच. यावेळी समाजाने बळ दिलं पाहिजे. समाजाने या सर्व गोष्टींना ताकदीने सामोरे गेले पाहिजे”, असंदेखील आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

    “आम्ही आमच्या लेकरांसाठी लढतोय. तुम्हाला बदनामीच्या पलिकडे काही आलं नाही. एखादा शब्द धरायचा आणि त्यावरुन ह्यांची दुकानदारी चालवायची एवढंच त्यांनी केलेलं आहे. खोटं बोलून पैसे कधीच कमवू नये. कारण खोटं बोलून कमावलेल्या पैशातून आपल्या लेकराला अन्न खाऊ घालू नये. दुसऱ्याच्या सुखसमाधीसाठी आपण आपल्या जातीला एवढं बदनाम करु नये. आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं करावं. नाही करता येईल तर किमान बदनाम तरी करु नये. समाजाचं वाटोळं तरी करु नये. माझ्या विरोधात तर नुसते षडयंत्र सुरु आहेत. रोज कोणी ना कुणी उठून सोशल मीडियावर टीका करत आहे” , असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा