• Mon. Nov 25th, 2024

    बाळाचा पहिला वाढदिवस रुग्णालयातच केला साजरा; कारण वाचून येईल डोळ्यात पाणी

    बाळाचा पहिला वाढदिवस रुग्णालयातच केला साजरा; कारण वाचून येईल डोळ्यात पाणी

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : सातव्या महिन्यातच तिला आईने जन्म दिला. पण एकेका श्वासासाठी तिला धडपड करावी लागत होती. खासगी रुग्णालयामध्ये उपचार देताना तिच्या कुटुंबीयांचा खिसा अन बँकखातेही रिकामे झाले. पण तिला बरे वाटेना. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या या बाळाला तेथील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि परिचारिकांनी उपचारांसह मायेची उबही दिली. तिला जीवदान मिळाले अन आज तिचा पहिला वाढदिवस या रुग्णालयामध्येच उत्साहात साजरा करण्यात आला.तिचे पूर्ण नाव अद्विका सौरभ दायमा. सिडकोतील त्रिमूर्ती चौकात दायमा कुटुंब राहते. भाग्यश्री दायमा यांनी सातव्या महिन्यात (दि. २२ मे २०२२) रोजी खासगी रुग्णालयात अद्विकाला जन्म दिला. परंतु, तिचे वजन होते केवळ ८०० ग्रॅम. पूर्ण वाढ न झाल्याने तिची प्रकृती जन्मापासूनच चिंताजनक होती. मुलीला वाचविण्यासाठी दायमा कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयांमध्ये सात दिवसांत सुमारे चार लाख रुपये उपचारांवर खर्च केला. मात्र, बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होईना. पैसे संपले पण बाळाचा जगण्यासाठीचा अन कुटुंबीयांचा तिला जगविण्यासाठीचा संघर्ष सुरूच होता. अखेर बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.

    टॉफी खाल्ली अन् तडफडू लागला ४ वर्षांचा चिमुरडा; आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत गेला जीव; कारण धक्कादायक
    ३० मे २०२२ रोजी अद्विका ‘एसएनसीयू’ विभागात दाखल झाली. येथे इ-पॅप उपचार पद्धती वापरून या बाळाला जगविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स आणि परिचारिकांनी प्रयत्न सुरू केले. अवघ्या काही दिवसांच्या या बाळाला व्हेंटिलेटरवर देखील ठेवावे लागले. अद्विकाची जगण्यासाठीची धडपड तब्बल महिनाभर सुरू होती. डॉक्टर्सचे कौशल्य आणि परिचारिकांच्या मेहनतीला हळुहळू यश येऊ लागले. तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने डॉक्टर्स आणि परिचारिकांना हायसे वाटले. तिला रुग्णालयामधील केएमसी कक्षात दाखल करण्यात आले.सव्वा महिने उपचार घेतल्यानंतर तिची प्रकृतीला असणारा धोका टळला. सोमवारी (दि. २२) अद्विका एक वर्षाची झाली. तिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी भाग्यश्री दायमा अद्विकासह सोमवारी जिल्हा रुग्णालयात त्याच एसएनसीयू विभागात दाखल झाल्या.

    डॉक्टरांसह स्टाफ भारावला

    प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण पवार, एसएनसीयूचे कक्षप्रमुख डॉ. पंकज गाजरे, डॉ. निखिल कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ डॉ. दिनेश ठाकूर, डॉ. कृष्णा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापण्यात आला. बाळाची सुश्रुषा करणाऱ्या एसएनसीयू वॉर्डातील इन्चार्ज सिस्टर छाया पवार, श्रद्धा पाटील, सीमा गवई, रिया राठोड, भारती शिंदे, आर. एस. पाटील, ज्योती खोडे यांच्याबद्दलची कृतज्ञता दायमा यांनी व्यक्त केली. यामुळे डॉक्टरांसह उपस्थित स्टाफही भारावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *