• Mon. Nov 25th, 2024

    Thane News : आरोग्य विभागाने दिली चिंताजनक माहिती; चार महिन्यांत डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांमध्ये वाढ

    Thane News : आरोग्य विभागाने दिली चिंताजनक माहिती; चार महिन्यांत डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांमध्ये वाढ

    म. टा . वृत्तसेवा, ठाणे : गेल्या चार महिन्यांत १५० रुग्णांना मलेरिया झाल्याचे समोर आले आहे. एप्रिलमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने जिल्ह्यात ४९ रुग्ण आढळले होते, तर डेंग्यूचे एप्रिल महिन्यात दोन रुग्ण आढळले असून चार महिन्यांत २५ रुग्णांची नोंद झाली आहे. गतवर्षापेक्षा गेल्या चार महिन्यांत डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण महापालिका हद्दीत आढळून आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून करोना आणि स्वाइन फ्लूचे प्रमाण ओसरले असले तरी डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय दिसून येत आहे. अस्वच्छ पाण्याचे डबके साचून त्यात अॅनोफिलिस जातीच्या डासांची निर्मिती होते. हा डास चावल्याने मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूचे प्रमाण अधिक असते, मात्र आता उन्हाळ्यातही शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मलेरियाचे डास वाढत आहेत.

    दरम्यान, ठाणे महापालिकेच्या हद्दीत एप्रिल महिन्यात ३१ रुग्ण, तर चार महिन्यांत १०६ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत तर डेंग्यूचा एप्रिलमध्ये एक तर चार महिन्यांत आठ रुग्ण आढळले आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत महिनाभरात १० आणि चार महिन्यांत १९ रुग्ण आढळले आहेत. अशुद्ध पाणी, मोठ्या प्रमाणात वाढलेले बांधकाम, अस्वच्छता या कारणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्यामुळे स्वच्छता ठेवणे हाच एक प्रतिबंधक उपाय आहे.

    Pune : उंड्री रोडवर भीषण अपघात; बसचा ब्रेक फेल, कारसह अनेक वाहनांना धडक, दोन ठार
    हिवताप दिन साजरा

    गेल्या महिन्यात जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी यंदा जागतिक आरोग्य संघटनेमार्फत नावीन्य आणि अंमलबजावणी हे धोरण जाहीर करण्यात आले आहे. डासांची उत्त्पत्ती होत असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे, वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथामिक आरोग्य केंद्रांत घेतल्या जाणाऱ्या मासिक सभांमध्ये आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती द्यावी व हिवतापाबाबत जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

    जानेवारी ते एप्रिलदरम्यानची रुग्णसंख्या

    तालुका मलेरिया रुग्ण डेंग्यू रुग्ण

    ठाणे पालिका १०६ ०८

    कल्याण १९ ०५

    उल्हासनगर ०८ ०२

    नवी मुंबई ०७ –

    भिवंडी – ०४

    भाईंदर १० ०६

    एकूण १५० २५

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *