• Sun. Mar 15th, 2026
    Raigad News : सस्पेन्स संपला, रायगडमध्ये महायुतीचं जुळलं, अखेर तीनही पक्ष एकत्र, ZP अध्यक्ष भाजपचा होणार, काय-काय घडलं?

    रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता निश्चित झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरुन पडद्यामागे प्रचंड राजकीय घडामोडी सुरु होत्या. अखेर या घडामोडींना आता पूर्णविराम मिळाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला राजकीय तिढा अखेर सुटला आहे. जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रायगड जिल्हा परिषद सत्तेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महायुती सत्तेत येणार आहे.

    ठरलेल्या सूत्रानुसार, पहिल्या सव्वा वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे. उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील काळात सत्तेचे वाटप ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

    गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हा परिषद सत्तेसाठी विविध राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापनेची हालचाल केल्याची चर्चा रंगली होती. याबाबत अलिबाग येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. मात्र त्याआधीच मुंबईत झालेल्या बैठकीत महायुतीचा निर्णय झाल्याने सर्व घडामोडींना कलाटणी मिळाली. या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत राज्यातील महायुतीप्रमाणेच रायगड जिल्ह्यातही एकत्र सत्ता स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

    ५९ सदस्य संख्या असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्यांची आवश्यकता आहे. येथे शिवसेनेचे २१, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १५ सदस्य विजयी झाले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ५ आणि काँग्रेसचे २ सदस्य आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

    दरम्यान, ठरलेल्या सूत्रानुसार जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पेण तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या पेण तालुक्यातील नेतृत्वाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे राजकीय वातावरण उत्सुकतेने पाहत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा