म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : उरण भागात प्लॉट तसेच घरे यांची विक्री करण्याच्या बहाण्याने सर्वसामान्यांकडून लाखो रुपये उकळून त्यांना जागा न देता त्यांची फसवणूक करणारी महालँड कंपनी व तिच्या मालकाविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३७ ग्राहकांनी कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र या कंपनीकडून फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.महालँड कंपनीने २०१८मध्ये उरणच्या रांजणपाडा परिसरातील चिरनेर, विंधणे व धाकटी जुई या भागात एक अथवा त्यापेक्षा जास्त गुंठ्याचे प्लॉट तसेच महालँड कंपनीच्या ‘माय होम ड्रीम होम’ योजनेअंतर्गत फ्लॅटच्या विक्रीबाबत वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातींना भुलून शेकडो ग्राहकांनी महालँड कंपनीमध्ये लाखो रुपये भरून प्लॉट तसेच फ्लॅटची नोंदणी केली. त्यानंतर खरेदीखत कण्याचे, तसेच दोन वर्षांत ताबा देण्याचे आश्वासन महालँड कंपनीने ग्राहकांना दिले होते. मात्र कंपनीकडून खरेदीखत करण्यात आले नाही. दोन वर्षांनंतरही या कंपनीचे काम बंदच राहिल्याने अनेक ग्राहकांनी या कंपनीसोबत व्यवहार रद्द केले. त्यानंतर कंपनीने १२ ग्राहकांची रक्कम अंशत: परत केली. मात्र उर्वरित २५ ग्राहकांचे पैसे आजपर्यंत परत दिले नाहीत. त्यामुळे महालँड कंपनीकडून फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांनी मनसेकडे तक्रार केली होती.
Raigad Crime: औरंगाबादच्या सरकारी इंजिनिअर तरुणीने रायगडमध्ये आयुष्य संपवलं, चिठ्ठीत लिहून गेली…
पोलिस आयुक्तांकडून दखलमनसेचे जुईनगर विभाग अध्यक्ष अक्षय भोसले यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन महालँड कंपनीने ३७ गुंतवणूकदारांची ९४ लाख ७४ हजारांची फसवणूक केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिस आयुक्त भारंबे यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा युनिट-१ने महालँड कंपनीचे मालक पंडित राठोड यांच्याविरोधात सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.