Taloja-Khandeshwar Metro: नवी मुंबईत अनेक वर्षांपासून रखडलेल्या दुसऱ्या मेट्रो मार्गिकेला अखेर मंजुरी मिळाली आहे. तळोजा ते खांदेश्वरदरम्यान ही मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव असून यासाठी 5575 कोटींची खर्च अपेक्षित आहे.
कशी असेल मार्गिका?
ही 8.15 किमी लांब मार्गिका तळोजा आणि खांदेश्वरदरम्यान उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळे कामोठे, कळंबोली आणि तळोजासारख्या शहरांना जोडणी मिळणार आहे. यामुळे पनवेल परिसरातील विकासालाही चालना मिळणार आहे. ही मेट्रो तयार झाल्यानंतर नवी मुंबई शहरात रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ अशा प्रमुख पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या मेट्रोचा प्रस्ताव पहिल्यांदा 2011मध्ये सिडकोने मांडला होता. त्यावेळी या मार्गाचा खर्च 1,605 कोटी रुपये अपेक्षित होता. 15 वर्षात हा खर्च 5 हजार 575 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Western Railway: ‘मिनी मॉल’, ‘कॅफे’सारख्या सुविधा रेल्वे स्थानकावरच! पश्चिम रेल्वेचं महसूल दुप्पट करण्याचं उद्दिष्ट; कसा होईल फायदा?
कुठे असतील स्थानकं?
तळोजा-खांदेश्वर मेट्रो मार्गिकेवर एकूण 8 स्थानकं प्रस्तावित आहेत. ही मार्गिका कामोठे, कळंबोली, तळोजा एमआयडीसी आणि खांदेश्वर या भागांमधून जाणार आहे. या मार्गावर खांदेश्वर, कामोठे सेक्टर 10, कळंबोली सेक्टर 2E, कळंबोली सेक्टर 7E, कळंबोली सेक्टर 13, कडाडी, एमआयडीसी स्थानक 1, एमआयडीसी स्थानक 2 अशी आठ स्थानके प्रस्तावित आहेत. सध्या नवी मुंबईमध्ये बेलापूर ते पेंढार मेट्रो मार्गिका आहे. या मार्गिकेशी नवी मुंबई मेट्रो 2 ला थेट जोडण्याचा देखील प्रस्ताव आहे.
मेट्रो 1 आणि मेट्रो 2 च्या जोडणीसाठी 2.2 किमी विस्ताराची गरज असणार आहे ज्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही आहे. दरम्यान, 2 किमी स्पर मार्गिकेने नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पण थेट जोडणीचा प्रस्ताव आहे.
Mumbai News: 2019पासून मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार सुरू, अखेर मे महिन्यात काम पूर्ण; SV Roadवर कोंडीमुक्त प्रवास
तळोजा एमआयडीसी परिसरात दररोज हजारो कर्मचारी प्रवास करतात. या औद्योगिक केंद्रामध्ये प्रवास करण्यासाठी नागरिकांना बस किंवा लोकलने प्रवास करावा लागतो. रोजची लोकलची गर्दी आणि वाहतूककोंडीतून यामुळे नागरिकांची सुटका होणार आहे. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर या परिसरातील उद्योगांना चालना मिळणार आहे. त्याशिवाय नवी मुंबईतील प्रवासही सोपा होणार आहे.
