• Tue. Sep 8th, 2026

Weather Alert: मार्चच्या अर्ध्यावरच मुंबई तापली; भट्टीसारख्या वातावरणाचा अनुभव, हवामान विभागाने सांगितले तापमानवाढीचे कारण

Weather Alert: मार्चच्या अर्ध्यावरच मुंबई तापली; भट्टीसारख्या वातावरणाचा अनुभव, हवामान विभागाने सांगितले तापमानवाढीचे कारण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मार्चचा अजून अर्धा महिनाही संपलेला नाही तोच महामुंबई परिसरात तीन वेळा दोन ते तीन दिवसांच्या अंतराने भट्टीसारख्या वातावरणाचा अनुभव आला आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी तसेच शनिवारसाठीही उष्ण आणि तुलनेने अधिक दमट वातावरणाचा सामना करावा लागेल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला होता.

मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे शुक्रवारी २४ तासांमध्ये सुमारे चार अंशांनी पारा चढला. सकाळच्या वेळी आर्द्रतायुक्त तर दिवसभरात कोरडे वारे होते. त्यामुळे उष्ण वाऱ्यांच्या झळा मुंबईकरांना अधिक जाणवल्या. कोकणामध्ये शनिवारीही उष्ण वातावरणाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३७ अंश तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. सांताक्रूझ येथे कमाल तापमानाचा पारा ३.८ अंशांनी तर कुलाबा येथे २.६ अंशांनी अधिक होता. सांताक्रूझ येथे गुरुवारपेक्षा शुक्रवारचा पारा ३.९ अंशांनी तर कुलाबा येथे दीड अंशांनी वाढला. मंगळवारी १० मार्चला ४० अंशांपर्यंत पारा चढल्यानंतर मध्ये अवघे दोनच दिवस मुंबईकरांना तुलनेने कमी झळांचे मिळाले. ११ मार्चला ३४.२ तर १२ मार्चला ३३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. शुक्रवारी मुंबईत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटही जाणवली. विक्रोळी येथे ३९.७, राममंदिर येथे ३८.६, विद्याविहार येथे ३७.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

अरबी समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे समुद्रावरून येणारी हवा जमिनीपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वातावरणातील उष्णता वाढत असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. सकाळच्या वेळी आग्नेय दिशेकडून हवा येत असून १२ नंतर समुद्रावरून येणारी हवा जमिनीवर येते. आग्नेय दिशेकडून येणारी हवा दीर्घ काळ लांबली तर वातावरणाचा ताप अधिक वाढण्याचा अंदाज असतो, असे प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले.

राज्यात चार दिवसांत वादळी पावसाचा अंदाज

राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने शुक्रवारी केले.

सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊसआणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्चदरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे. त्यानुसार शेतीकामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.आणखी वाचा

विद्यार्थी हित, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि वाचन संस्कृती वृद्धीसाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यावा – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार – महासंवाद
समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed