• Fri. Sep 11th, 2026

Dombivli Traffic: डोंबिवली स्टेशनबाहेर प्रंचड गर्दी असते. त्याप्रमाणात वाहतूक कोंडी देखील जास्त आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड हा उपाय ठरणार आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
राजलक्ष्मी पुजारे , डोंबिवली :स्टेशन परिसरातून बाहेर पडताना प्रवाशांची होणारी घुसमट, रिक्षांसाठी तासनतास रांगा, चौकाचौकांत होणारी वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या रांगा या दुष्टचक्रातून डोंबिवली शहराची रिंगरोडमुळे सुटका होणार आहे. मात्र रिंग रोडच्या याच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले होते. हे काम सुरू करण्यासाठी रस्त्याचे संरेखन बदलण्यास महासभेने मान्यता दिली आहे. त्यामुळे रिंग रोडचा मार्ग मोकळा झाला आहे.

म्हणून काम रखडले

एमएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या मार्गातील अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करून देताच रस्त्यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल. कोपर ते भोपरपर्यंतच्या मार्गात काही परिसरांतील इमारती बाधित होत असल्याने या मार्गाला विरोध होत होता आणि त्यामुळे काम रखडले होते.

नव्या आरेखनाला मंजुरी दिली

यामुळेच या रस्त्याचे संरेखन बदलण्याची मागणी होत होती. अखेर प्रशासनाने या मार्गाचे आरेखन बदलले असून, काही भाग खाडीकिनारी भागातून वळवला आहे. या नव्या आरेखनाला महासभेने मंजुरी दिली आहे. हा बहुतांश भाग मोकळा असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया राबविणे सुकर होणार आहे. तसेच टप्पा तीनच्या धर्तीवर दुप्पट टीडीआरच्या माध्यमातून या जागा ताब्यात घेणे सोयीचे होणार असल्याने तुलनेने या रस्त्याचे काम सुरू करणे शक्य होईल, असे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले.

उड्डाणपुलाचे काम सुरू

राज्य सरकार आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्राभोवती फिरणारा तसेच कल्याण आणि डोंबिवली शहरांतील प्रत्येक भाग जोडण्यासाठी आठ टप्प्यांत रिंगरोड प्रस्तावित आहे. यातील टप्पा क्र.४ ते ७ या दुर्गाडी ते टिटवाळा रस्त्याचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. टप्पा क्र. ३ ते ४ या दुर्गाडी ते मोठागावपर्यंत खाडीकिनाऱ्यावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : FDAचा धडाका! IRCTC, इस्कॉनशी संबंधित कँटिनवर कारवाईची तलवार, भेसळीवरही स्ट्राईक; कोणाचे परवाने निलंबित?

पर्यायी मार्ग उपलब्ध

या मार्गामुळे कल्याण ते डोंबिवली हे अंतर सहा मिनिटांत गाठता येणार आहे. मात्र, डोंबिवली पूर्वेकडील कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड टप्पा क्र. १ आणि २चे काम रखडले होते. हा मार्ग कोपर रेल्वे स्थानकाजवळून थेट आयरे रोडमार्गे भोपरकडून काटई नाक्यापर्यंत जाणारा असून, काटई नाका येथे कल्याण-शीळ रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे डोंबिवलीतून बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

दरम्यान नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयरे गावात देखील आरेखन बदलण्याची केलेल्या सूचनेनुसार बदल करत नकाशा अंतिम केला जाणार असल्याचे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Maharashtra TimesCSMT–Sawantwadi train: आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी ‘मेसेज’;चा गोंधळ,कोकणकर हैराण

प्रवाशांना दिलासा मिळणार

डोंबिवलीलगतच्या जुन्या प्रीमियम कंपनीच्या जागेवर आणि २७ गावांमध्ये मोठमोठी संकुले उभी राहिली आहे. या परिसराला डोंबिवली हे एकमेव रेल्वे स्थानकअसल्याने डोंबिवली स्थानकावरील गर्दीचे प्रमाण काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गर्दीमेळे अनेक प्रवाशांनी जीव गमवाला असून अपघातांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या संख्येमुळे स्टेशन परिसरात रिक्षा अपुऱ्या पडतात. प्रवाशांना तासनतास रिक्षांची प्रतीक्षा करत रांगेत थांबावे लागते. या गर्दीवर आणि मानपाडा रोडपर्यंत होणाऱ्या कोंडीवर रिंग रोड हाच एकमेव पर्याय असल्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा