• Wed. Jul 29th, 2026
    महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार

    Weather Update: राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हिंगोली, धाराशिव,नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये २९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात संततधार सुरूच असली तरी पावसाची तूट कायम असताना पुण्यातील पाऊस जुलैमधील विक्रम मोडेल असा अंदाज आहे.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई/नागपूर/पुणे : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत आजपासून ३१ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची तसेच या तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पाऊस अपेक्षित आहे.

    या काळात अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार, २९ जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. ३० जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो.

    Maharashtra TimesVidarbha Rain Update : विदर्भातील 3 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, नागपूरमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

    मुंबईतही जोर वाढणार

    मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३० आणि ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३० जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.

    नागपूरमध्ये मुसळधार

    शहरात मंगळवारी दुपारी अवघ्या काही तासांत झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. ठिकठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचल्याने अनेक नागरिक अडकले, तर दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात बुडाली. काही शाळांमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना दोरखंडांच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढावे लागले. स्वावलंबीनगर भागात तर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बोटीचा वापर केला.

    शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला. खोदकामे, अपूर्ण रस्ते आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

    जुलैतील पाऊस मोडणार विक्रम?

    जुलैमध्ये पहिल्या दहा दिवसांतच महिनाभराची सरासरी ओलांडणाऱ्या पावसाने मंगळवारी पाचशे मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. शहरात १ जुलै ते २८ जुलै, मंगळवारी रात्रीपर्यंत साडेआठपर्यंत ५०८.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या जुलै महिन्याची नोंद ही गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक पावसाची म्हणून होणार आहे. याशिवाय, १९०७ मध्ये जुलैत झालेल्या ५०८.५ मिमी पावसाचा विक्रम मोडल्याचीही नोंद होण्याची चिन्हे आहेत.
    पावसाने पुण्यात यंदा जूनमध्ये ओढ दिल्याने महिन्याची सरासरी देखील गाठता आली नव्हती; पण जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली आणि दहा दिवसांतच महिनाभराची सरासरी ओलांडली. त्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती; पण गेल्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. पुणे शहरात एक जून ते २८ जुलै या कालावधीत ५७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहराबरोबरच जिल्हा आणि घाटमाथ्यावरही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

    दरम्यान, शहरात मंगळवारीदेखील आकाश दिवसभर ढगाळ होते आणि दुपारी बाराच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. उपनगर आणि धरणक्षेत्रात मध्यम पाऊस पडला. पुढील दोन दिवस शहरात आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार; तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा