• Wed. Jul 29th, 2026

    महामुंबईत रेल्वेविस्ताराचे लक्ष्य; पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही विकास

    महामुंबईत रेल्वेविस्ताराचे लक्ष्य; पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही विकास

    Mumbai Rail Expansion: मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे सहभाग भांडवल ५०० कोटींवर आळं असून महामुंबईत रेल्वेविस्ताराच लक्ष्य आहे. एमयूटीपी प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेड कंपनीचे प्राधिकृत समभाग भांडवल २५ कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रेल्वेजाळे भक्कम करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.

    भांडवल वाढवण्यास मान्यता

    मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली आहे. या कंपनीत रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात अनुक्रमे ५१:४९ या प्रमाणात भागभांडवल आहे. या महामंडळाकडून मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करणे, क्षमता वाढविणे, सुधारणा करणे आणि प्रवाशांना आधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी पायाभूत विकास प्रकल्प राबविण्यात येतात. आता या महामंडळाकडे सोपविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आकार वाढत असल्याने खेळत्या भांडवलात वाढ करण्यासाठी महामंडळाच्या समभाग भांडवलात वाढ करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्राधिकृत समभाग भांडवल २५ कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयापर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

    Maharashtra TimesMultimodal Tunnel : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, BMC चा मल्टीमोडल बोगदे प्रोजेक्ट, पुढील 30 वर्षांच्या ट्राफिकनुसार स्ट्रॅटेजी

    महामंडळामधील एकूण अधिकृत समभाग भांडवलापैकी भरणा केलेले समभाग भांडवल २५ कोटी रुपयांवरून २२५ कोटी करण्यासही मान्यता देण्यात आली. या वाढीपोटी राज्य शासनाच्या हिश्याचे ९८ कोटी रुपयांचे योगदान देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

    मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ( एमआरव्हीसी ) ‘एमयूटीपी’ प्रकल्पसंचातून महामुंबईत रेल्वेमार्गांची क्षमता वाढवण्याचे प्रकल्प पूर्ण करण्यात येतात. ‘एमयूटीपी-१’ हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. एमयूटीपी २, ३, ३ अ आणि ३ ब या प्रकल्पांच्या माध्यमातून नवीन पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंतचा विस्तार, कल्याण ते आसनगाव / बदलापूरदरम्यान तिसरी-चौथी मार्गिका यांसह अन्य महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

    महामुंबईत एकूण ६४,६४४ कोटींची कामे

    सद्यस्थितीत महामुंबईत ६४ हजार ६४४ कोटी रुपयांहून अधिक विकास कामे सुरू आहेत. राज्य सरकारच्या निर्णयामुळे ‘एमआरव्हीसी’च्या आर्थिक पायाभरणीला अधिक बळकटी मिळाली आहे. वाढीव भांडवली आधारामुळे महत्त्वाकांक्षी उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी, रेल्वे क्षमतावाढीला गती आणि मुंबईचे रेल्वेजाळे अधिक सुरक्षित, जलद व कार्यक्षम करण्यास मदत होईल. याचा लाभ लाखो प्रवाशांना मिळेल, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार

    मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्ववत

    मुंबई-पुणेदरम्यान लोणावळा ते कर्जत घाट मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेवरून पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास रवाना झाली. यामुळे मुंबई-पुणे घाटातील सर्व मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

    अतिवृष्टीमुळे ६ जुलै रोजी घाट रेल्वेमार्गात दरड कोसळण्यासह भूस्खलन झाले होते. त्यामुळे घाटातील तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक खंडित झाली. रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अकराशे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दिवसरात्र काम केल्यानंतर दोन मार्गांवरील प्रवासी वाहतूक सुरू झाली होती. तिसऱ्या मार्गाखालील खडींसह जमीन वाहून गेल्याने त्याला वेळ लागला. हे काम सोमवारी रात्री पूर्ण झाले. त्यानंतर खंडाळा आणि मंकी हिल स्थानकांदरम्यानच्या अप मार्गावर पहिले इंजिन धावले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा