Monsoon Update: मुंबईत सध्या मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षा कायम असून आणखी चार ते पाच दिवस घामाच्या धारा कायम राहण्याची शक्यता आहे. केरळमधील मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्यामुळे राज्यातही मान्सून दाखल होईपर्यंत जून महिना उजाडणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार केरळमध्ये २६ मे (नियोजित तारखेच्या आधी किंवा नंतर चार दिवस) मान्सून दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, अंदमानच्या समुद्रातील उर्वरित भागापर्यंत मान्सून पोहोचायला आणखी दोन- तीन दिवस लागतील, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मुंबईमध्येही मान्सूनपूर्व सरींची शक्यता नसून, सध्याचे उष्ण वातावरण पुढील चार ते पाच दिवस कायम असेल, असा अंदाज आहे.
मुंबई, ठाण्यातील वातावरण तापले
नैर्ऋत्य मौसमी वारे केरळच्या किनारपट्टीपर्यंत ३१ मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता फारशी नाही. त्यामुळे केरळमध्ये पुढील किमान चार ते पाच दिवस मान्सूनचे आगमन होणे अनिश्चित असल्याचे हवामान अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. राज्याच्या किनारपट्टीवर येणारे वारेही उत्तरेकडून येत असल्याने ते उष्णतेचा पारा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. सध्या मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधील वातावरण या वाऱ्यांमुळे तापलेले आहे. देशात पश्चिमी प्रकोप नसल्याने तसेच मान्सूनपूर्व चक्रीवादळे निर्माण झालेली नसल्याने राज्यात मान्सूनपूर्व पावसाला चालना मिळालेली नाही.
Weather Alert: मुंबईतील उकाडा आणखी वाढणार, महाराष्ट्रात कुठे अलर्ट, तर कुठे पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा अंदाज
भारताच्या दक्षिणेला सध्या ढगांच्या द्रोणीय स्थितीमुळे तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व सरींचा अनुभव नागरिकांनी घेतला. मात्र, या द्रोणीय स्थितीच्या एका बाजूला कोरडे वारे असून हे वारे विदर्भामध्ये आहेत. सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या आधी उत्तर महाराष्ट्रातही काही प्रमाणात पावसाचा अनुभव येतो. मात्र, यंदा हा पाऊस अनुभवता आला नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळामध्ये उकाडा वाढलेला असताना मान्सूनपूर्व सरींचा दिलासा यंदा नागरिकांना फारसा मिळालेला नाही.
शुक्रवारपासून उष्णतेची लाट कमी होणार
मध्य भारत आणि वायव्य भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटांची स्थिती कायम असू शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर शुक्रवार, २९ मेपासून उष्णतेच्या लाटांची तीव्रता कमी होईल, तसेच कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात पुढचे नऊ दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याची चर्चा आहे. सध्या राज्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा असल्या तरी ही तीव्रता थोडी कमी होईल, असा अंदाज आहे.
Bullet Train: पारसिक डोंगराखाली बुलेट ट्रेनचा बोगदा; कटरहेड घणसोली शाफ्टमध्ये दाखल, ‘अंडरग्राऊंड टनल’चा मार्ग कसा असेल ?
हा अंदाज शास्त्रीय अभ्यासानुसार वर्तवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रह-ताऱ्यांवर आधारित माहितीवर हवामानाचे अंदाज पसरवले जाऊ नयेत, असे आवाहन भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे. सध्याची उष्णता तापदायक असल्याने त्यातच आणखी नऊ दिवस हे वातावरण कायम राहील, अशी चर्चा सुरू असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा