Crime News: क्लायंटला भेटण्यासाठी रात्री बाहेर पडलेले हायकोर्टाचे वकील मिथुन भास्कर यांचा संभाजीनगरातील गांधेली फाट्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळलेला मृतदेह पाहून एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
मृत्यूशी झुंज देत हायकोर्टाचा वकील 150 मीटर धावला, पण मारेकऱ्यांनी डाव साधलाच; क्लायंटला भेटायला गेले अन् घात झाला!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोडवरील गांधेली फाट्याजवळ बुधवारी रात्री उशिरा एका उच्च न्यायालयाच्या वकिलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक पाहणीत त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याचे दिसून येत असून, लूटमारीच्या उद्देशाने त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिथुन भास्कर वय ४९, रा. आनंद नगर असे मयत वकिलाचे नाव आहे.
काय घडलं नेमकं?
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गांधेली फाट्या जवळ एक मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिथुन भास्कर हे त्यांच्या दुचाकीवरून एमएच २० जीएन १६०८ या परिसरात आले होते. त्यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये न्यायालयीन कामकाजाची काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे ते रात्रीच्या वेळी आपल्या एखाद्या क्लायंटला भेटण्यासाठी आले असावेत आणि त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंचनामा करताना हत्येचं गंभीर प्रकरण समोर
दरम्यान, घटनेचा पंचनामा करताना पोलिसांना मुख्य रस्त्यापासून १५० मीटर आत झुडपांमध्ये रक्ताचे सडे आढळले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांनी आधी आतमध्ये त्यांच्यावर हल्ला केला असावा, असा अंदाज आहे. मांडीच्या भागावर चाकूने वार केल्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला.
जखमी अवस्थेतही भास्कर यांनी स्वतःला वाचवण्यासाठी मुख्य रस्त्याकडे धाव घेतली, मात्र तिथे पोहोचताच ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
पोलीस तपासाला वेग, ठसे मिळाले
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली. गंभीर जखमी भास्कर यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
फॉरेन्सिक टीमला भास्कर यांच्या दुचाकीवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातांचे ठसे मिळाले आहेत.भास्कर यांची दुचाकी आणि त्यातील साहित्य सुरक्षित असल्याने ही घटना केवळ लूटमारीच्या उद्देशाने घडली की यामागे काही नियोजित कट होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा