• Thu. Sep 10th, 2026

Sharad Pawar: शरद पवारांची साथ सोडण्यामागील खरं कारण अन् महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा; वळसे पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतरामागे विकासाचे कारण पुढे केले होते. मात्र, शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचे खरे कारण उघड केले असून, त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, केवळ आणि केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली,” असा थेट आणि खळबळजनक खुलासा वळसे पाटलांनी केला आहे.

डिंभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटलांनी आपल्या राजकीय भूमिकेचा उलगडा केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझ्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत हा वादग्रस्त बोगदा कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. हा बोगदा रद्द व्हावा आणि शेतकऱ्यांचे पाणी वाचावे, म्हणूनच आपण शरद पवार यांच्यापासून दूर होऊन अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“मी त्यावेळी जेव्हा ही गोष्ट उघड केली, तेव्हा राजकीय विरोधकांनी मी केवळ मतांसाठी आणि निवडणुकीपुरते हे बोलत असल्याचा आरोप केला होता. मात्र, आज वास्तव सर्वांसमोर उभे ठाकले आहे,” असे सांगत वळसे पाटलांनी विरोधकांवर पलटवार केला.

दरम्यान, हा प्रकल्प जर रेटण्याचा प्रयत्न झाला, तर चारही तालुक्यांतील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि भीषण पाणीटंचाई निर्माण होईल, असा इशारा देत त्यांनी सरकारला निवेदनाद्वारे जुन्या शब्दाची आठवण करून दिली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार असून, शासन स्तरावर काय निर्णय होतो यावरच आपली पुढची दिशा ठरेल, असे सांगत वळसे पाटलांनी सरकारला एक प्रकारे निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुती सरकारवरही आता मोठा दबाव निर्माण झाला आहे.