• Wed. Sep 9th, 2026

Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, भाजप नगरसेविकेची पोलीस ठाण्यात तक्रार

ठाण्यातील भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी डान्सर गौतमी पाटील हिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मृणाल पेंडसे यांनी गौतमीचा व्हिडीओ शेअर करत तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्याविरोधात ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृणाल पेंडसे यांनी केली आहे. गौतमीने अश्लील हावभाव आणि अश्लील नृत्य केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृणाल पेंडसे यांनी केली आहे. राजकीय कारण वगैरे नाही तर एक महिला म्हणून आपण ही तक्रार केल्याचं मृणाल पेंडसे यांनी म्हटलं आहे.

“अशाप्रकारे अश्लील हावभाव सादर केले जात असतील तर त्यांचा आम्ही निषेधच करु. एक महिला म्हणून मला वाटतं की, कोणत्याही पक्षाचे आयोजक असूद्या. कोणत्या जात किंवा धर्माचे असूद्या. या गोष्टीचा आम्ही निषेधच करु. याविरोधात तक्रार करण्यासाठी आम्ही आज नौपाडा पोलीस ठाण्यात आलो होतो. मी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बातचित केली आहे. तसेच महिला आयोगातदेखील मी तक्रार करणार आहे”, अशी भूमिका मृणाल पेंडसे यांनी मांडली आहे.

मृणाल पेंडसे यांनी शेअर केला गौतमीचा व्हिडीओ

मृणाल पेंडसे यांनी फेसबुकवर डान्सर गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गौतमी पाटील ही मंचासमोर असलेल्या सर्वांना तुम्ही माझे डार्लिंग लोकं आहेत, असं म्हणताना दिसते. तसेच इथे मी कुणालाही भाऊ मानत नसल्याचं तिने म्हटलं. यानंतर तिने तुम्हाला एक पप्पी देते म्हणत फ्लाईंग किस केलं. हा व्हिडीओ शेअर करत मृणाल पेंडसे यांनी कारवाईची मागणी केली आहे.

मृणाल पेंडसे आणखी काय म्हणाल्या? पाहा व्हिडीओ

“मी पोलीस आयुक्त आणि महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्या सणांच्या आणि उत्सवांच्या नावाखाली जो काही हिडीसपणा सुरु आहे, गौतमी पाटील ही जी कलाकार आहे, ती ज्या पद्धतीचे डायलॉग बोलते, अश्लील हावभाव करते ते पाहून खरंतर आपण आपल्या सणांचं पावित्र्य हरवून बसलो आहोत, असं वाटत आहे”, असं मृणाल पेंडसे म्हणाल्या.ॉ

“एकीकडे आपण पाहतोय की, समाजात इतक्या विकृती आहेत. मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना रोज कानावर पडतात. आपण एकीकडे ही विकृती थांबली पाहिजे असं म्हणतो. पण या अशा नृत्यामुळे आणि डायलॉगमुळे आपण या विकृतीला प्रोत्साहन देण्याचं काम करतोय. कारण दहीहंडीच्या उत्सवात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत पुरुष, महिला सर्वजण सहभागी होतात. अशा सार्वजनिक मंचावरुन अश्लील नृत्य करणं आणि अशाप्रकारचे डायलॉग बोलणं म्हणजे विकृतीला तुम्ही पाठबळ देत आहात”, अशी भूमिका पेंडसे यांनी मांडली.