• Thu. Sep 10th, 2026

Narendra Bhondekar : महायुतीत नाराजीच्या चर्चा, शिंदेंच्या आमदाराला काँग्रेसची ऑफर, नरेंद्र भोंडेकर यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रात सातत्याने ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन टायगरची चर्चा होत असताना भंडाऱ्यातून एक वेगळीच बातमी समोर येत आहे. भंडाऱ्यात सत्ताधारी शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना काँग्रेसने पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : एकीकडे राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन लोटस’ आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असताना आता भंडाऱ्यातूनही पक्षांतराच्या राजकारणाला हवा मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी भोंडेकर यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मात्र या ऑफरला फारसे महत्त्व दिलेले नाही. आपल्याला थेट साखरकर यांच्याकडून कोणतीही ऑफर मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सकाळपासून काही लोकांचे फोन आले आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साकरकर यांनी आपल्याला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याचे त्यातून समजल्याचे भोंडेकर यांनी सांगितले.

नरेंद्र भोंडेकर काय म्हणाले?

भोंडेकर म्हणाले, मला कधी आणि कोणी ऑफर दिली, याची माहिती नाही. आज सकाळी काही लोकांचे फोन आले. त्यातून मुकुंद साखरकर यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याचे समजले. साखरकर चांगले व्यक्ती आहेत. त्यांनी प्रेमापोटी किंवा विनोदाने ते बोलले असतील. मात्र ही वेळ कोणत्या ऑफरची नाही आणि हा विषय तेवढा महत्त्वाचा नाही, भंडारा जिल्ह्याच्या विकासावर आपले लक्ष असून, यापूर्वी मंजूर झालेली कामे पूर्ण करण्यासोबतच नवीन कामांना मंजुरी मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हात मजबूत करायचे आहे, असेही नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटले.

भंडाऱ्याच्या राजकारणात नरेंद्र भोंडेकर यांच्या नाराजीची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र भोंडेकर महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. भंडारा जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. याबाबत विचारले असता भोंडेकर म्हणाले, जे काही आरोप-प्रत्यारोप होते, त्यावर काल आमच्या जिल्हाप्रमुखांनी व्हिडिओच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना आणि भाजपच्या जिल्हाप्रमुखांनी ठरवले आहे की, आता या विषयावर कोणीही बोलायचे नाही. सोशल मीडियावरही कोणी या विषयावर बोलणार नाही. हा विषय थांबावा, अशी आमचीही अपेक्षा आहे, ज्यांनी या विषयाची सुरुवात केली, त्याला उत्तर देणे आमच्याकडून झाले. मात्र आता हा विषय संपला असून सर्वांनी विकासकामांवर लक्ष केंद्रीत करावे, असेही त्यांनी सांगितले.

रोहित पवार यांच्या गोंदिया दौऱ्यावर भोंडेकर यांची प्रतिक्रिया

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या गोंदिया दौऱ्याबाबतही नरेंद्र भोंडेकर यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार किंवा इतर नेते आपापले पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यभर फिरत आहेत. नेत्यांनी भंडारा, गोंदियासारख्या दुर्गम भागात येणे ही चांगली बाब आहे. आता महाराष्ट्राच्या दुर्गम भागात, भंडारा, गोंदियामध्ये नेते येऊ लागले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत होईल. याआधी पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सांगली, सातारा या भागातच नेते अधिक दिसायचे. त्यांच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचा फायदा होत असेल तर त्याचा आनंद आहे आणि त्याचे स्वागत आहे, असे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.