• Wed. Jun 17th, 2026
    मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पारा 36 अंशावर, पुण्यातही उन्हाचा चटका वाढला; उष्णतेने नागरिक हैराण

    Weather Update 25 March: मुंबई, पुणे, ठाण्यासह रायगड जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. पण त्याचवेळी मध्य महाराष्ट्रासह कही जिल्ह्यांमध्ये येत्या 2-3 दिवसांत हलक्या सरींची अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, मुंबई/पुणे: मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी, मंगळवारी कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांहून अधिक नोंदला गेला. हा ताप बुधवारीही कायम असण्याचा असा अंदाज असून, मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाचा ताप जाणवण्याची शक्यता आहे. यासाठी तिन्ही जिल्ह्यांना उष्ण वातावरणासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

    मुंबईत सरसरीहून अधिक तापमान

    प्रामुख्याने उत्तर कोकण विभागात मंगळवारी सरासरीहून कमाल तापमान दोन ते अडीच अंशांहून चढे होते. सांताक्रूझ येथे सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमान ३६ अंशांहून अधिक नोंदले गेले. येथे ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते, तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे सरासरीहून ३.८ अंशांनी, तर कुलाबा येथे २.६ अंशांनी तापमान अधिक नोंदले गेले. डहाणू येथे ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून २.९ अंशांनी जास्त होते. मुंबईमध्ये किमान तापमानाचा पाराही आर्द्रतेमुळे सरासरीहून अधिक होता. कुलाबा येथे २५.७ तर सांताक्रूझ येथे २४.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

    पुण्यात उन्हाच्या तीव्र झळा

    गेल्या आठवड्यात अनुभवायला मिळालेल्या आल्हाददायक वातावरणानंतर पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. शहरात दोन दिवसांत तापमानात वाढ झाली असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात उपनगरांसह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. यामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा जाणवत होता. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच वातावारणात मोठा बदल झाला आहे.

    दुपारी उकाडा, पहाटे गारवा शहरात चढ उतार जाणवत आहेत. दुपारच्या वेळी गरम वारे वाहत असून, घामाच्या धारा वाहत आहेत. घरांमध्येही उकाडा वाढला असून, संध्याकाळपर्यंत उष्ण हवा जाणवत आहे. पहाटेच्या वेळी हवेत अद्यापही हलका गारवा आहे. मंगळवारी पुण्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. पुण्यासह मध्य महाराष्ट्रातही तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहू शकते, असा अंदाज आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा