गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांच्या आंदोलनानंतर रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका करत सिलिंडर येईपर्यंत सामान्यांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? असा सवाल केला.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक
या आंदोलनादरम्यान भाजप आमदार चित्रा वाघ यांनी एलपीजीचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी या दाव्याचा जोरदार समाचार घेतला. “गॅस येईपर्यंत आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?” असा खोचक सवाल करत त्यांनी राजकीय वातावरण तापवले आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. चित्रा वाघ यांनी सिलेंडर उपलब्ध असल्याचे सांगत विरोधकांना ‘सिलेंडर बुक करायला सांगा’ असा सल्ला दिला होता.
Jay Pawar : पिंकी माळींच्या कुटुंबाला भेटायला जय पवार आले, बिल्डिंगची लिफ्ट डगमगली, 18 मजले पायी उतरण्याची सावधगिरी
रोहिणी खडसे यांचा ‘एक्स’वरून पलटवार
रोहिणी खडसे यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवरून चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना ‘वि’चित्रा’ ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले.” चित्रा वाघ यांनी ‘सिलेंडर २५ दिवसांत मिळतात’ असा जो दावा केला होता, त्यावरून खडसे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.
“सामान्य गृहिणीने २५ दिवस वाट पाहायची का?”
रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांना सवाल केला की, “अहो वि’चित्रा’ ताई… एका सामान्य गृहिणीच्या घरचा गॅस आज संपला, तर तिने २५ दिवस वाट पाहायची का? ठीक आहे, वाट पाहू; पण गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का?” खडसे यांच्या या टोलेबाजीमुळे आता चित्रा वाघ यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
