• Wed. Jun 17th, 2026
    नगरसेवकांना भिवंडीच्या रिसॉर्टवर नेण्याची तयारी, फोटोसाठी भाजप शहराध्यक्षांनी स्टेअरिंग धरलं, बस हॉटेलच्या भिंतीवर धडकली

    Vidhan Parishad Election : ​विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजप नगरसेवकांना ठाण्यातील भिवंडी येथील एका रिसॉर्टवर नेण्याची तयारी सुरू असताना भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांना सुरक्षितता म्हणून सहलीवर नेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मिन्नतवारी करावी लागत आहे. ‘भाव’ फुटत नसल्याने आणि जोपर्यंत ‘लक्ष्मीदर्शन’ होत नाही, तोपर्यंत आम्ही येणार नाही, असा पवित्रा काहींनी घेतल्याने सहलीच्या समन्वयक नेत्यांचीच कोंडी झाली आहे. त्यामुळे काहींना टोकन देऊन, तर काहींना आश्वासनाचा ‘शब्द’ मिळाल्याने सोमवारी (दि. १५) भाजपचे ७२ पैकी ६६, तर शिवसेनेचे उर्वरित नगरसेवक ठाण्याकडे रवाना झाले. ग्रामीण भागातील अनेक नगरसेवक अद्यापही ‘वेटिंग’वर असल्याचे चित्र आहे.

    महायुतीतील मतदारांची नाराजी कायम

    विधान परिषदेचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असतानाही महायुतीतील मतदारांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे. उमेदवार नरेंद्र दराडेंबाबतची मतदारामधली नाराजी दूर करताना नेत्यांची दमछाक होत आहे. गेल्या वेळी निवडून आल्यानंतर दराडेंनी मतदारांकडे ढुकूंनही बघितले नसल्याने मतदार नाराज आहेत. त्यामुळे मतदारांना सहलीवर नेतांनाही पदाधिकाऱ्यांना दमछाक करावी लागत आहे. त्यात मतांचा ‘भाव’ फुटत नसल्याने नगरसेवकांत अस्वस्थता आहे.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : उबाठाचे सात खासदार फुटण्याच्या चर्चा, धोका टाळण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन, सहा दिवसांनी काय घडणार?
    शिवसेनेचे शहरातील २६ पैकी २५ नगरसेवक सहलीवर गेले आहेत. तर, भाजपच्या ७२ पैकी ६६ नगरसेवकांना सहलीवर पाठवताना नेत्यांना नाकीनऊ आले होते. सोमवारी दुपारी पाथर्डी फाटा येथील हॉटेलवर नगरसेवकांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी मतदारांनीही ‘आमचे काय ते आधी बोला, मग आम्ही येतो,’ असा पवित्रा घेतल्याने समन्वयकांचीही कोंडी झाली. त्यांना आश्वासन दिल्यानंतर कसेबसे नगरसेवकांना घेऊन महापौर हिमगौरी आहेर-आडके, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, उपमहापौर विलास शिंदे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांच्यावर नगरसेवकांच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक अद्यापही निघण्यासाठी ‘वेटिंग’वर असल्याचे चित्र आहे.

    आंदोलन मागे, तरी फडणवीस सरकारला घाम फोडला! कर्जमाफीसाठी रोहित पवार ठाम

    दराडेंच्या नावाचा ‘व्हिप’

    या निवडणुकीसाठी महायुतीकडे साडेचारशेहून अधिकचे बहुमत आहे. तरीही दगाफटका नको म्हणून नगरसेवकांना सहलीवर नेले जात आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मतदान करण्यासंदर्भातील पक्षादेश (व्हिप) भाजपने नगरसेवकांना सोमवारी बजावला. सहलीसाठी वाहनात बसताना नगरसेवकांच्या हातात पक्षाचा व्हिप ठेवण्यात आला आहे.
    Maharashtra TimesSanchita Ugale : संचूss उठ ना बबड्या, मला आई म्हण ना… अभिनेत्री संचिता उगलेला अखेरचा निरोप देताना आईची व्याकुळ अवस्था

    शहराध्यक्षांचा अतिउत्साहीपणा

    मतदानापूर्वी भाजप नगरसेवकांना ठाण्यातील भिवंडी येथील एका रिसॉर्टवर नेण्याची तयारी सुरू असताना भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आला. माध्यमांना फोटो देण्याच्या नादात त्यांनी थेट बसच्या चालकाला सीटवरून खाली उतरवले आणि स्वतः ‘ड्रायव्हिंग सीट’वर बसून बसचे स्टेअरिंग हातात घेतले. मात्र, बस सुरू करताच त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि अनर्थ घडला. ती बस हॉटेलच्या आवारातील भिंतीला जाऊन जोरात धडकली. या धडकेत बसचे किरकोळ नुकसान झाले असून, सर्व नगरसेवक सुरक्षित आहेत. या प्रकारामुळे काही काळ हॉटेल परिसरात प्रचंड गोंधळ आणि घबराट निर्माण झाली होती.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा