• Fri. Mar 20th, 2026
    Kalyan Crime : ‘मी माझ्या बायकोचा जीव घेऊन आलोय’; पोलिसांजवळ आपल्या कृत्याची थेट कबुली, पोटच्या लेकासमोर त्याच्या आईला संपवलं

    Kalyan Crime News: ‘मी माझ्या पत्नीला मारून आलो आहे’, असे शब्द जेव्हा या आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये उच्चारले तेव्हा पोलिसही गोंधळात पडले की, नक्की तो कशाबद्दल बोलतोय.

    कल्याण उंबर्डे हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : कल्याणमधील उंबर्डे परिसरात एक मोठी घटना समोर आली आहे. आपल्या बायकोची हत्या करून नाशिकला जाऊन स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेल्या पतीच्या कबुलीजबाबामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर (वय 25) असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती विशाल साहेबराव भुतकर (वय 30) याने ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    पुन्हा संसार सुरू करु…

    घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना आणि विशाल हे दोघं गेल्या दीड वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे अलिप्त राहत होते. विशाल हा मोठ्या मुलासह नाशिकमध्ये राहत होता, तर पत्नी अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावातील केडीएमसी गार्डनजवळील एका चाळीत राहून घरकाम करून आपल्या पाच वर्षांच्या मुलीचा सांभाळ करत होती. दरम्यान, 11 मार्च बुधवारी रोजी विशाल नाशिकहून कल्याणमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आला होता. पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्याची विनवणी त्याने अर्चनाजवळ केली. मात्र, अर्चनाने त्याला या गोष्टीसाठी नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या विशालने आपली पत्नी अर्चनावर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.Maharashtra TimesPune Lift Accident CCTV : लहान बाळाचा हात लिफ्टच्या दारात अडकला, पुण्यातील सोसायटीत गोंधळ, सुदैवाने गंभीर प्रसंग टळला

    हत्या केल्यानंतर आरोपी फरार

    दरम्यान, पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी विशाल नाशिकलापळून गेला आणि तेथील पोलीस ठाण्यात जाऊन ‘मी माझ्या बायकोला मारून आलो आहे’, अशी कबुली दिली. यानंतर नाशिक पोलिसांनी तत्काळ कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि खडकपाडा पोलिसांचे पथक उंबर्डे परिसरातील घटनास्थळी पोहोचले असता अर्चना भुतकर हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यानंतर अर्चनाच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली.

    Maharashtra TimesNashik Accident: तीर्थयात्रेसाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या नाशिकमधील ५० भाविकांच्या बसला अपघात; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी

    या प्रकरणी मयत अर्चनाचा मामेभाऊ याने दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार तपास पथक नाशिकला रवाना करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकर याला तिथून अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात मोठी बाब म्हणजे, विशाल आणि अर्चनाचा असलेल्या नऊ वर्षांच्या मुलासमोर ही घटना घडली, आणि या घटनेचा तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचं तपासात समोर आलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा