• Wed. Sep 9th, 2026

Crime News: मुंबईजवळील शहरात सीएकडून मोठं कांड; तब्बल ५०० कोटी विदेशात, बनावट कंपन्यांतून कसा केला घोटाळा?

Mira Bhayandar News: स्वतःच्या हितासाठी आर्थिक व्यवहारांमध्ये चुकीची पद्धत अवलंबून भारताबाहेर रक्कम पाठवणे, तसेच देशाच्या परकीय चलनसाठ्यात घट करून आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपांवरून सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबईजवळील शहरात सीएकडून मोठं कांड(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भाविक पाटील, मिरा भाईंदर: कंपन्यांचे तब्बल ४९५ कोटी ३० लाख रुपये भारतामधून विदेशात बेकायदा वर्ग केल्याप्रकरणी भाईंदरमधील एका चार्टर्ड अकाऊंटंटविरोधात (सीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर चुकीच्या माहितीच्या आधारे प्रमाणपत्रे देऊन बनावट खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम विदेशात पाठवल्याचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाच्या तपासातून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भारतातून विदेशात जाणाऱ्या, तसेच विदेशातून भारतात येणाऱ्या आर्थिक व्यवहारांची प्राप्तिकर विभागाकडून तपासणी केली जात आहे. यादरम्यान भाईंदर पश्चिमेतील विनायक रोड येथे कार्यालय असलेला सीए महेंद्र पुरोहित याने विदेशात पैसे पाठवण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र चुकीच्या माहितीच्या आधारे जारी केल्याचे निदर्शनास आले.

प्राप्तिकर नियमांनुसार पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम विदेशात पाठवण्यासाठी सीएचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे या प्रकरणाचा सविस्तर तपास प्राप्तिकर विभागाकडून सुरू करण्यात आला. यात सीएच्या शिक्क्याने ५०० कोटी विदेशात विविध नावांनी नोंदवलेल्या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ४९५ कोटी ३० लाख रुपये बेकायदा पद्धतीने विदेशात वर्ग केल्याचे आढळून आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश कंपन्या बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. सन २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांत ही आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी सहायक कर अधिकारी सच्चिदानंद चौरसिया यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पुरोहितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात घेऊन भाईंदर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. यासंदर्भात प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. हा निधी नेमका कोणत्या कारणासाठी विदेशात पाठवण्यात आला, संबंधित कंपन्यांना हा पैसा कसा प्राप्त झाला, आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जाणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा