• Sat. Jun 6th, 2026
    Nagpur News : नोकरीचा मोह सोडून देशसेवेचा मार्ग; नवव्या प्रयत्नात प्रथमेशची आर्मी लेफ्टीनंट पदावर निवड

    नागपूरच्या प्रथमेश चौधरीने उच्च पगाराची नोकरी सोडून ९ व्या प्रयत्नात भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातली आहे. बालाकोट आणि पुलवामाच्या घटनांनी प्रेरित होऊन देशसेवेचा मार्ग निवडलेल्या प्रथमेशचा हा संघर्षमय प्रवास

    कॉर्पोरेट करिअर सोडून भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर निवड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : जिद्द, संयम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे अशक्य वाटणारे स्वप्नही प्रत्यक्षात उतरू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण नागपूरच्या प्रथमेश चौधरी यांनी घालून दिले आहे. बालाकोट, पुलवामा यांसारख्या सैन्य कारवायांनी प्रेरित होऊन त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पगाराची नोकरी सोडत देशसेवेचा मार्ग स्वीकारला आणि अखेर ९ व्या प्रयत्नात संघ लोक सेवा आयोग ( UPSC ) तर्फे आयोजित टेक्निकल स्कीम डायरेक्ट एंट्री (TGC/TES) प्रक्रियेत यश मिळवत आर्मी कमिशन्ड ऑफिसरच्या लेफ्टीनंट पदावर निवड मिळवली आहे.

    कॉर्पोरेट नोकरी सोडून सैन्यात जाण्याचा निर्णय

    प्रथमेश हे बी.टेक. (मेकॅनिकल इंजिनिअर) असून त्यांची बॉश लिमिटेडमध्ये फ्रंटलाईन मॅनेजर पदावर कॅम्पस सिलेक्शनद्वारे निवड झाली होती. चांगला पगार, स्थिर करिअर आणि प्रतिष्ठा असलेली ही नोकरी असतानाही त्यांच्या मनात देशसेवेची ओढ कायम होती. अखेर २०२३ मध्ये त्यांनी नोकरीचा मोह सोडून पूर्णवेळ तयारी करण्याचा निर्णय घेतला.

    लहानपणापासून सैन्यात जाण्याची इच्छा

    दहावी झाल्यानंतरपासूनच त्यांना सैन्यदलात जाण्याची तीव्र इच्छा होती. शालेय जीवनात एनसीसीचे प्रशिक्षण घेता आले नाही, याची खंत त्यांच्या मनात होती. बारावीनंतर त्यांनी एनडीएची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर ते इंजिनिअरिंगच्या शिक्षणात गुंतले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्यांची बॉश लिमिटेडमध्ये निवड झाली.

    Maharashtra TimesPune Gangwar : पुण्यात पुन्हा टोळी युद्धाचा भडका, वर्चस्वाच्या वादातून गंगाधाम रोडवर मध्यरात्री गोळीबार, तरुण जखमी

    अपयशानंतरही न सोडले प्रयत्न

    दरम्यान देशात घडलेल्या बालाकोट आणि पुलवामासारख्या सैन्य कारवायांनी त्यांच्यावर खोल परिणाम केला. या घटनांनी त्यांच्या मनातील देशसेवेची ज्वाला अधिक प्रखर केली. शेवटी २०२३ मध्ये त्यांनी ठाम निर्णय घेत नोकरीचा राजीनामा दिला आणि सैन्य अधिकारी होण्यासाठी तयारी सुरू केली.

    त्यांचा प्रवास मात्र सोपा नव्हता. या काळात त्यांना तीन वेळा स्क्रीन-आऊट आणि पाच वेळा कॉन्फरन्स-आऊटचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी हार मानली नाही. सातत्यपूर्ण अभ्यास, संयम आणि ध्येयावर असलेला विश्वास यांच्या बळावर त्यांनी अखेर नवव्या प्रयत्नात यश मिळवले.

    ‘मुलाने दिलेला अभिमान जिजाऊ होण्याचा सन्मान’

    प्रथमेशचे वडील भोजराज चौधरी हे सीमाशुल्क विभागात कार्यरत आहेत, तर आई चित्रा चौधरी या सार्वजनिक आरोग्य सेवेत परिचारिका आहेत.

    त्या म्हणाल्या, “प्रथमेश आमचा एकुलता एक मुलगा आहे. तो वैद्यकीय सेवेत यावा अशी माझी इच्छा होती; पण ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून त्याने देशसेवेचा मार्ग निवडला. मुलाने दिलेला हा अभिमान मला जणू ‘जिजाऊ’ होण्याचा सन्मान देऊन गेला. आमच्या कुटुंबाची सैन्यदलाची पार्श्वभूमी नसतानाही प्रथमेशने देशसेवेचा मार्ग निवडला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्याचा हा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा