• Sat. Sep 5th, 2026

Dombivli Rohit Achrekar : डोंबिवलीतील रोहित आचरेकर आणि त्यांच्या ‘वे टू कॉज रायडर्स क्लब’च्या साथीदारांचा डोंबिवली ते कारगिल असा सुरू झालेला हा अभिमानास्पद आणि देशभक्तीपूर्ण प्रवास ‘डोंबिवलीचा मानबिंदू’ असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.

डोंबिवली रोहित आचरेकर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘एक बंधन, रक्षाबंधन’ या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून डोंबिवलीतील रोहित आचरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभक्तीची अनोखी ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. रोहित आचरेकर यांच्या ‘वे टू कॉज रायडर्स क्लब’तर्फे गेल्या २० वर्षांपासून ‘एक बंधन, रक्षाबंधन’ हा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’च्या माध्यमातून या उपक्रमाला सहकार्य करत आहेत.

२२५२ किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास

यंदा ‘शिवराष्ट्र – राष्ट्र प्रथम, वीर सर्वोपरि’ या विचाराला समर्पित असलेल्या या उपक्रमांतर्गत डोंबिवली ते कारगिल असा २२५२ किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास करत देशभक्तीपूर्ण राईडला सुरुवात करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी कारगिल येथे सुमारे १००० स्क्वेअर फूटचा भव्य तिरंगा फडकवण्यात आला, तर विजयपथावर १२ स्क्वेअर फूट आकाराचे ४२ तिरंगे फडकवण्यात आले.

Maharashtra TimesPratap Sarnaik:स्क्रॅप रिक्षांविरोधात ५ ऑक्टोबरपर्यंत कारवाई होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले स्पष्ट निर्देश

८० स्क्वेअर फूट तिरंग्याचे Hand Hoisting

यानंतर कारगिलपासून सुरू झालेल्या बाईक राईडमध्ये लेह, तुरतुक, पँगाँग लेक, हानले, उमलिंग ला आणि लामायुरू असा प्रवास करत प्रत्येक ठिकाणी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ८० स्क्वेअर फूट तिरंग्याचे Hand Hoisting करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश घेऊन हा संपूर्ण प्रवास यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. या प्रवासादरम्यान २८ ऑगस्ट रोजी कारगिल येथे भारतीय सैनिकांसमवेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. वीर जवानांच्या हातावर राखी बांधून जवानांप्रती असलेले कृतज्ञतेचे बंध आणखी दृढ करण्यात आले.

आज पुन्हा डोंबिवलीत दाखल

कारगिलपासून सुरू झालेला हा देशभक्तीचा प्रवास पूर्ण करून रोहित आचरेकर आणि त्यांचे साथीदार आज पुन्हा डोंबिवलीत दाखल झाले. सीमेवर तिरंगा फडकवून तसेच जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करून सुरू झालेला हा प्रवास डोंबिवलीचा मानबिंदू असलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन पूर्णत्वास आला आहे. देशाच्या सीमेपासून डोंबिवलीपर्यंत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश पोहोचवणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा