Mumbai Malad Malvani Seven Year Old Boy Dies : दहीहंडी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र, या सणावर यंदाही विरजण पडलं आहे. कारण दहीहंडी फोडताना एका 7 वर्षीय मुलाचा करुण अंत झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास चिकूवाडी,मालवणी येथील एकता वेल्फेअर सोसायटी परिसरात ही घटना घडली. काही मुले स्थानिक पातळीवर दहीहंडीचा उत्सव साजरा करत होती. यावेळी दहीहंडीसाठी दोरी एका झाडाला आणि तळमजल्यावरील विटांच्या खांबाला बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक विटांचा खांब कोसळला. यावेळी जवळ असलेल्या रुद्र कदम या 7 वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं.
Dahi Handi 2026: दृष्टीआडची जिद्द, थरांवरची भरारी! 2017पासून महिला गोविंदांची परंपरा; यंदा तीन थरांचे आव्हान पेलणार
रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू
मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच वॉर्ड कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दहीहंडी उत्सव साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
लोखंडी कमान काढताना रॉड पडून पुण्यात महिलेचा करुण अंत
पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात दहीहंडी उत्सव साजरा होत असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान काढत असताना त्याचा लोखंडी भाग महिलेच्या अंगावर पडल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण, (वय 45), असं मृत महिलेचं नाव आहे.
Mumbai Dahi Handi : ‘गोविंदा रे गोपाळा’; मुंबई आज सकाळपासूनच ‘गोविंदा’मय! उंचीच्या ‘थर’थराटाला आयोजकांचे बळ, 11 थरांसाठी बक्षिसांची होणार लयलूट
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या सांगवी परिसरात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी उत्साहात पार पडली. उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. याचवेळी सलमा पठाण या आपल्या पतीसोबत घटनास्थळी उभ्या होत्या. लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू असतानाच अचानक लोखंडी भाग त्यांच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या.
मृत महिलेचा मुलगा दहीहंडी मंडळात
घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनं जुन्या सांगवी परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी केली. चौकशीदरम्यान मृत महिलेचा मुलगा याच दहीहंडी मंडळात असल्याचं समोर आलं. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मंडळातील इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, तसेच मृत महिलेचा मुलगाही याच मंडळाशी संबंधित असल्याने, कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
