उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेसाठी निघालेल्या पवारांचे विमान धावपट्टीपासून ५० मीटर दूर कोसळले. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी याच विमानतळाच्या विकासाचे आदेश दिले होते.
अजित पवारांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला. अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचार सभा घेण्यासाठी मुंबईहून बारामतीला निघाले होते. बारामतीत लँडिंग करत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. धावपट्टीपासून ५० मीटर दूरवर विमान कोसळलं. दैवदुर्विलास म्हणजे अजित पवारांनी या विमानतळावर सुरक्षित लँडिंग व्हावं, यासाठी दुरुस्तीचे आदेश अजित पवारांनी दिले होते. याच विमानतळावर लँडिंग करताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला.
चार महिन्यांपूर्वी, ऑक्टोबर महिन्यात अजित पवारांनी बारामतीमधील विमानतळ विकसित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यासाठी त्यांनी बैठकदेखील घेतली. रात्रीच्या वेळी लँडिंग करण्यासाठी लाईटची व्यवस्था करण्याचे आणि रडार सिस्टिमसह अन्य तांत्रिक सुविधांना लवकरात लवकर विकसित करण्याचे आदेश अजित पवारांकडून देण्यात आले होते. सरकार लवकरच सर्वच लहान विमानतळं विकसित करेल. २४ तास वापरता येतील, या हेतूनं विमानतळांवर सोयी सुविधा उभारल्या जातील, असं अजित पवार यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
राज्यातील विमान उड्डाण क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवण्यासाठी अजित पवार यांनी आराखडा तयार केला होता. लहान विमानतळांवरील टेक ऑफ आणि लँडिंग सोयीस्कर आणि सुरक्षित करण्यासाठी लवकरच विस्तृत योजनेच्या अंतर्गत काम करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या होत्या. लहान विमानतळांवरील फ्लाईट्सची संख्या वाढवण्याचा विचार यामागे होता. यासाठी एक योजना तयार करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या होत्या.
