Kopargaon Husband Commits Suicide after Murder Wife : राज्यात गुन्हेगारीचं वावटळ प्रचंड प्रमाणात उठलं आहे. रोज कोणत्या न् कोणत्या कारणावरुन कुणाची न् कुणाची हत्या झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील कोपरगावमध्ये घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन नवऱ्याने तिची हत्या केली, त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चासनळी गावात मयत दिलीप मिजगुळे यांचा चहा विक्रीचा व्यवसाय होता. तर त्यांची पत्नी स्वाती मीजगुळे अंगणवाडी सेविका होती. मीजगुळे दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्याने आणि घरातील भिंतीवर मजकूर लिहिलेला असल्याने नेमकी घटना काय, हा घटनाक्रम काय? कोणत्या कारणामुळे ही घटना घडली? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अगोदर पत्नीला संपवले आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अधिक माहिती पोलीस घेत आहे.
Akola News : बैलांच्या आंघोळीसाठी नदीवर, पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नदीत पडला, बैल काठावर हंबरत राहिले, पण शंतनू…
दरम्यान, मयताची मुलगी गायत्री अजय जोशी (रा. पुणतांबा, ता. राहता) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शेजाऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली असून त्यात म्हटलं आहे की, ‘आरोपी गोरख चौरे ,संदीप चौरे आणि आशा चौरे यांनी माझ्या वडिलांना वारंवार त्रास दिल्याने आणि भांडण केल्याने वडिलांनी गळफास लावून स्वतःला संपवलं आहे’. या प्रकरणी तिघांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहे.

