• Mon. Sep 7th, 2026

एका ७५ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक 

ByMH LIVE NEWS

Apr 9, 2026
एका ७५ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक 

पुणे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यातच आता शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली पुण्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या ११ दिवसात ५४ कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ७५ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सायबर चोरट्याने या वृद्धाला तब्बल १२ कोटी ३१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक पुण्यातील हडपसर भागात राहतात. जानेवारी महिन्यात त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज आला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांना व्हि आय पी स्टॉक २४ नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले.

या ग्रुपमधील चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. यावेळी चोरट्यांनी असा दावा केला की, आम्ही ज्याप्रमाणे सांगू त्याप्रमाणे जर तुम्ही गुंतवणूक केली, तर अवघ्या ११ दिवसात तुम्हाला ५४ कोटी रुपयांचा परतावा मिळेल. इतक्या कमी दिवसात इतका जास्त नफा मिळणार, या परताव्याच्या आमिषाला बळी पडून ज्येष्ठ नागरिकाने गुंतवणुकीस सुरुवात केली.

३ महिन्यात १२ कोटी लुबाडले

सायबर चोरट्यांच्या सांगण्यावरून त्या व्यावसायिकाने गेल्या तीन महिन्यांत वेगवेगळ्या ८ बँक खात्यांवर वेळोवेळी पैसे ट्रान्स्फर केले. गुंतवणूक केल्याचे भासवून चोरट्यांनी त्यांच्याकडून एकूण १२ कोटी ३१ लाख रुपये उकळले. मात्र, जेव्हा परतावा मिळण्याची वेळ आली, तेव्हा चोरट्यांनी टाळाटाळ सुरु केली. यानंतर मग आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

सध्या पुणे सायबर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहे. तसेच ज्या बँक खात्यांवर पैसे वर्ग झाले आहेत, त्यांची माहिती काढली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुप, जादा परताव्याचे आमिष दाखवणारे मेसेज किंवा अनधिकृत ट्रेडिंग ॲप्सपासून नागरिकांनी सावध राहावे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत संस्थांची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर दुसरीकडे पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे सायबर चोरट्यांचे सत्र सुरूच असल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed