• Sun. Jun 28th, 2026

    पाच तयार होते, सहावा खासदार ऐकेना! CM फडणवीसांनी कसं मन वळवलं? पडद्यामागे काय काय घडलं?

    पाच तयार होते, सहावा खासदार ऐकेना! CM फडणवीसांनी कसं मन वळवलं? पडद्यामागे काय काय घडलं?

    Operation Tiger: गेल्या अनेक महिन्यांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा होती. अखेर चार दिवसांपूर्वी ठाकरेसेनेच्या ६ खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शिवसेना उबाठाचे ६ खासदार फोडत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. ठाकरेसेनेचे ९ पैकी ६ खासदार शिंदेसेनेच्या गळाला लागले. त्यांनी चारच दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला आणि ‘ ऑपरेशन टायगर ‘ पूर्ण झालं. या ऑपरेशनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडल्याची माहिती समोर आली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ची मोहीम फत्ते करण्याकरिता आवश्यक खासदारांचं संख्याबळ पूर्ण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई मोलाची ठरल्याची सूत्रांची माहिती आहे.

    शिवसेना (ठाकरे गट) खासदार फोडाफोडीचं राजकारण रंगात आलं असताना पूर्णपणे मौन बाळगून असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सूचक विधान करत धक्का दिला होता. ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि रुग्ण एकदम सुदृढ आहे. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असं म्हणत मुख्यमंत्री प्रथमच या सर्व घडामोडींवर उघडपणे व्यक्त झाले होते. कारण ऑपरेशन टायगरचे तर ठरले होते. परंतु त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की शिवसेनेत हेच ठरत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबाबत मौन बाळगले होते.

    विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच खासदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पण, जानेवारी, २०२६ मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून यावर गंभीरपणे विचार सुरू झाला. या आधी खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान पाच वेळा तरी भाजप श्रेष्ठींची भेट घेतली होती. परंतु, खासदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की शिवसेनेत यावर निर्णय होत नव्हता. बहुतांश खासदारांची हाती कमळ धरण्याची इच्छा होती, मात्र खासदारांना शिवसेनेतच प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. याकरिता केंद्रीय नेतृत्वाबरोबर फडणवीस यांच्या बैठकाही झाल्या.

    शिवसेनेत प्रवेश द्यायचा की भाजपमध्ये यावर काथ्याकूट झाल्यानंतर एप्रिलमध्ये ‘ऑपरेशन टायगर’साठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दाखवला. पाच खासदारांना आपल्याकडे वळवण्यात शिंदे यांना यश आलं. त्यावेळी प. बंगालमध्ये तृणमूलचे आमदार-खासदार फोडफोडीचे राजकारण ऐन भरात होते. भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीस यांच्याकडे विचारणा होऊ लागली. परंतु खासदारांचं संख्याबळ पाचच्या पुढे जात नव्हतं. अखेर ही जबाबदारी फडणवीस यांच्याकडे देण्यात आली.

    राजकीय कारकिर्दीची जबाबदारी
    मुख्यमंत्र्यांनी सहाव्या खासदाराशी संपर्क साधून त्याचं मन वळवलं. त्याच्या राजकीय कारकिर्दीची जबाबदारी घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आणि हा तिढा सुटला. जुनच्या दुसऱ्या आठवड्यात सूत्रं वेगाने हलली आणि ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णत्वाला गेलं. सहा खासदारांनी दिल्ली गाठत लोकसभा अध्यक्षांना पत्र देत ठाकरे गटाला शेवटचा दणका दिला. यानंतर २१ जूनला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा