Karuna Sharma : करुणा शर्मा यांना माझगाव सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. माझगाव सत्र न्यायालयाच्या निकालानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आणखी नवे आरोप केले. आपल्याला मुलीला उचलून घेऊन जाण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला.
“वांद्रे कुटुंब कोर्टाने 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. पण धनंजय मुंडे यांनी त्या विरोधात माझगाव सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. करुणा शर्मा या आपल्या पत्नी नाहीत. आपण त्यांना पोटगी देऊ शकत नाही, असं याचिकेत म्हटलं होतं. ही याचिका न्यायाधीशांनी फेटाळली आहे. मी माझ्या याचिकेत स्पष्टपणे म्हटलं आहे की, मी धनंजय मुंडे यांची 1998 पासूनची पहिली पत्नी आहे. त्यासाठी मी पोटगी मागितली आहे. मी 27 वर्षे धनंजय मुंडे यांच्या करियरसाठी दिले आहेत. त्यांची मुलं माझ्याकडे आहेत. त्यामुळे माझा पोटगीसाठी हक्क आहे”, असं करुणा शर्मा म्हणाल्या.
‘लग्नाचे फोटो शेअर करणार’
“वकील वकिलांचं काम करत असतात. त्यांनी त्यांची बाजू मांडली. पण न्यायाधीशांनी आम्हाला कागदपत्रांसाठी वेळ दिला. मी इंदौरला गेले. तिथूनही दस्तावेज आले. लग्नाचे दस्तावेज शोधले. परळी पोलीस ठाण्यातही काही दस्तावेज आहेत. माझे लग्नाचे फोटोदेखील आहेत. ते सर्व घेऊन मी माध्यमांवर शेअर करणार आहे”, असा इशारा करुणा शर्मा यांनी दिला.
‘आजपर्यंत मी गप्प, माझ्याविरोधात षडयंत्र’
“माझ्या पाठीमागे काही तरुणांना सोडण्यात आलं आहे. करुणा शर्माला प्रेम जाळ्यात फसवून तिच्यासोबत लग्न केलं तर तुम्हाला 20 कोटी देईल, अशी ऑफर धनंजय मुंडे यांनी काही तरुणांना दिली आहे. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. वाल्मिक कराडने त्या व्यक्तींना ऑफर दिली आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आजपर्यंत मी गप्प होते. पण दर दिवशी षडयंत्र सुरु आहेत”, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला.
“धनंजय मुंडे यांचे दलाल लोकं हे षडयंत्र रचत आहेत. धनंजय मुंडेंकडे एवढं डोकं नाही आणि ते लावतही नाही. बीडचा आका आता जेलमध्ये गेला. पुण्याचा आका आणि त्यांच्या जवळचे लोक मिळून हे कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा फोन बंद झाला आहे. मी सांताक्रुझ पोलीस एनसी टाकली आहे”, असं करुणा शर्मा यांनी सांगितलं.
‘मुलीला उचलून घेऊन जाण्याचे धमकीचे मेसेज’
“मला मेसेज येत आहेत की, तुझ्या मुलीला आम्ही उचलून घेऊन जाणार आहोत. तू धनंजय मुंडे यांच्या विरोधात तोंड उघडलं, तू कोर्टात गेली, पुरावे सादर केले तर आम्ही तुझ्या मुलीला उचलून घेऊन जाणार. तू एका बापाची औलाद आहे तर माझ्या मुलीला उचलून दाखव. मला षडयंत्रात गुंतवण्यासाठी कट कारस्थान रचत आहेत. बीडचे एसपी काँवत यांना मी पूर्ण पुरावे दिले आहेत. त्यांना मी पूर्ण चॅटचे पुरावे दिले आहेत. त्यांनी मला लिखित स्वरुपात तक्रार द्या. मी त्याच्यावर कारवाई करतो, असं म्हटलं आहे”, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली.