• Tue. Mar 10th, 2026
    Nagpur Crime: उशिरा का आलास विचारलं अन् त्याची सनकली, आईसमोरच धाकट्याने मोठ्या भावाल संपवलं, नागपूर हादरलं

    Nagpur Younger Brother Killed Older: नागपुरात एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला संपवलं आहे. उशिरा का आला याचं कारण विचारल्याने त्याला राग आला आणि त्यातून त्याने हे कृत्य केलं आहे.

    Lipi

    जितेंद्र खापरे, नागपूर: केवळ किरकोळ वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री घडली. या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. मृतक युवकाचे नाव राजू कुंभलाल यादव (वय ३०) असून, आरोपी त्याचा सख्खा लहान भाऊ विजय यादव (वय २३) आहे. या घटनेने आईसमोरच मोठ्या मुलाचा जीव गेल्याने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे.

    काय घडले नेमके?

    मंगळवारी (११ फेब्रुवारी) रात्री यादव कुटुंबात मोठा भाऊ राजू आणि आईने एकत्र जेवण केले. त्यानंतर आई घराबाहेर गप्पा मारत बसली होती. त्याच दरम्यान, लहान भाऊ विजय घरी परतला. मोठ्या भावाने त्याला उशिरा येण्याचे कारण विचारलं. विजयने स्पष्ट उत्तर न देता टाळाटाळ केली. यावर मोठ्या भावाने त्याला रागावले आणि पटकन जेवण करून झोपण्यास सांगितलं.

    मात्र, मोठ्या भावाने ओरडल्याने लहान भाऊ विजय चिडला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. याच रागाच्या भरात विजय घरातून धावत गेला आणि काही वेळातच हातात धारदार विळा घेऊन परतला. आईच्या डोळ्यांसमोरच त्याने मोठ्या भावाच्या गळ्यावर सपासप वार केले. यात राजू रक्ताच्या थारोळ्यात खाली जमिनीवर कोसळला. हे पाहताच आईने हंबरडा फोडला. तिच्या आक्रोशाने शेजारी काय झालं हे पाहायला धावत आले, समोरील दृश्य पाहून सारेच हादरले. गंभीर जखमी राजूला वाचवण्यासाठी शेजाऱ्यांनी खूप प्रयत्न केला. मात्र, प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

    या घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी विजय यादव वर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. केवळ किरकोळ वादातून एका भावाने दुसऱ्याचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आईसमोरच पोटच्या पोराचा दुसऱ्या पोराने जीव घेतल्याने तिने एकच हंबरडा फोडला, तिच्या वेदना पाहून साऱ्यांचे डोळे डबडबले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed