• Sat. Sep 5th, 2026

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट; डिलिट केलेले चॅट रिकव्हर झाल्याने केसला कलाटणी, सिया-केतननंतर आणखी एक तरुणाला अटक

Pune News: आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याने त्याच्या चौकशीतून या हत्याकांडामागील आणखी काही बाजू आणि पुरावे समोर येण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट; डिलिट केलेले चॅट रिकव्हर झाल्याने केसला कलाटणी(फोटोLipi)
पुणे : लोणावळ्यातील लोहगडावरून केतन अग्रवाल या तरुणाला दरीत ढकलून दिलेल्या धक्कादायक हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर आता त्यांचा वर्गमित्र रितेश हांगे याला पोलिसांनी गजाआड केले आहे. या हत्याकांडात झालेली ही तिसरी अटक असून, कट माहीत असूनही पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी माहितीनुसार, चेतन आणि सियाने रचलेल्या संपूर्ण कटाची कल्पना रितेशला आधीपासूनच होती. १८ जून रोजी केतनला संपवण्यासाठी दोघांनी रितेशलाही लोहगडावर सोबत येण्याची गळ घातली होती; मात्र त्याने प्रत्यक्ष जाणे टाळले. गुन्हा घडल्यानंतरही तो आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. स्वतःचा सहभाग लपवण्यासाठी त्याने चेतनसोबत झालेले व्हॉट्सॲप संभाषण डिलिट केले होते. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी हे चॅट्स रिकव्हर करताच त्याचे बिंग फुटले.

अटक करण्यात आलेला रितेश हांगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तिघेही एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती. ​पोलिसांनी त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील ‘सक्सेस ग्रुप’ या रिअल इस्टेट कंपनीचा संचालक असलेला २६ वर्षीय केतन अग्रवाल याचा २० वर्षीय सिया गोयल हिच्यासोबत साखरपुडा झाला होता. नोव्हेंबर महिन्यात दोघांचा विवाह निश्चित झाला होता. मात्र, १८ जून २०२६ रोजी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून सियाने केतनला ट्रेकिंगसाठी लोहगडावर नेले. तेथे तिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनला थेट कड्यावरून खोल दरीत ढकलून दिले.

​सुरुवातीला केतनचा पाय घसरून अपघात झाल्याचा बनाव या दोघांनी रचला होता. मात्र, गडावरील सीसीटीव्ही तपासताना चेतन हुडी घालून संशयास्पदरीत्या फिरताना आढळला आणि घातपाताचा संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवताच, प्रेमसंबंधांत अडथळा ठरत असल्यानेच काटा काढल्याची कबुली सिया आणि चेतनने दिली. सध्या हे दोघेही येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू आहे.