Santosh Deshmukh Case Dhananjay Munde Resignation:- मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी फोटो व्हायरल झाले. त्यानंतर आज धनंजय मुंडे हे आज राजीनामा देणार आहेत.
सुत्रानुसार, काल झालेल्या बैठकीत मुंडेच्या राजीनाम्यावर सर्वच नेत्यांमध्ये एकमत झाले होते. . थोड्या वेळातच धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सूपूर्द करणार आहेत. मस्साजोग प्रकरण घडल्या नंतर मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी करण्यात येत होती.नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र विरोधकांकडून नैतिकतेचा आधार हा इतक्या उशिरा असूच शकत नाही अशी टीका करण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांनी मस्साजोग प्रकरणी आपला कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले होते. मात्र मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांची गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. वाल्मिक कराड हे सीआयडीच्या आरोपपत्रात हत्येतील मुख्य आरोपी असल्याचे म्हटले आहे. खंडणी प्रकरणी संतोष देशमुखांची हत्या झाली असल्याचे सीआयडीने आरोपपत्रात नमूद केले आहे.
फोटो व्हायरल झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे भावूक झाले होते. त्यांनी हे फोटो डिलिट करावे असे म्हटले आहे. धनंजय देशमुख यांच्या भेटीला सकाळी मनोज जरांगे पाटील पोहचले होते. त्यावेळी दोघेही भावूक झाले होते.
फोटो पाहून महाराष्ट्र झोपला नाही
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजीनामा वृत्तावर प्रतिक्रिया देताना म्हटले की काल अवघ्या महाराष्ट्राने फोटो पाहिले आणि अख्खा महाराष्ट्र झोपला नाही. आज काहीही करुन मुंडेंचा राजीनामा घेतला गेलाच पाहिजे. पारदर्शकतेसाठी हा राजीनामा गरजेचा आहे. आता अजित पवार यांनी हा निर्णय घेतलाच पाहिजे.

