Thakurli Bridge:कल्याण -डोंबिवली अंतर कमी करण्यासाठी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामातील बाधितांनी चर्चेदरम्यान सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट होते .
घरे एकाची आणि जागा दुसऱ्याची
डोंबिवली-ठाकुर्ली ते म्हसोबा चौकादरम्यान रखडलेल्या उड्डाणपुलात बाधित होणाऱ्या विस्थापितांचे पुनर्वसन बीएसयूपी प्रकल्पात करण्यात आले असले, तरी सात बाधितांचा प्रश्न रखडला होता. घरे एकाची आणि जागा दुसऱ्याची असल्याने निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात आली आहे.
दुप्पट टीडीआर दिला जाणार
जागामालकांनी पुलासाठी जागा रिकामी करून दिल्यास त्यांना दुप्पट टीडीआर दिला जाईल. तर जागामालक जागा रिकामी करण्यास असमर्थ ठरल्यास त्यांना जागेचा मोबदला म्हणून १२.५ टक्के टीडीआर आणि त्या भूखंडावरील घरासाठी घरमालकाला स्वतंत्र मोबदला दिला जाईल, असा निर्णय बाधितांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू करता येणार
या निर्णयाला बाधितांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नगररचना विभागाकडून जागेची टीएलआर मोजणी करून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू करता येईल, असा विश्वास लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Ramesh Mhatre Case: अशांना मोकळे सोडता कामा नये, नगरसेवक म्हात्रे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा संताप
काम मागील १० वर्षांपासून रखडले
ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद करण्यासाठी पूर्व-पश्चिम उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव रेल्वे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने २०१३मध्ये तयार केला. २०१६मध्ये या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर रेल्वेवरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. मात्र, ठाकुर्ली चौकातील कोंडी फोडण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे समांतर उड्डाणपूल उभारण्याचे काम मागील १० वर्षांपासून रखडले आहे.
तिढा अधिक वाढला
या पुलाच्या कामात बाधित होणाऱ्या ६० रहिवाशांना बीएसयूपी घरांचा ताबा देण्यात आल्यानंतर या जागा ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, सात घरे आणि इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्यक्षात जागा एकाची आणि घरे दुसऱ्याची असल्याने जागामालकांनी आणि घरमालकांनी मोबदल्यावर दावा केला. त्यामुळे हा तिढा अधिक वाढला होता.
Amit Thackeray Daughter : राज ठाकरे दुसऱ्यांदा झाले आजोबा! कुटुंबात चिमुकलीचे आगमन, अमित-मिताली यांना कन्यारत्न
मोबदला देत जागा ताब्यात घेतल्या जातील
हा तिढा सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवक तथा उपमहापौर राहुल दामले आणि स्थानिक नगरसेविका खुशबू चौधरी यांच्या पुढाकाराने या रहिवाशांना एकत्र आणून बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. प्रशासनाने सर्वेक्षण पूर्ण करताच बाधितांची यादी निश्चित करून त्यांना मोबदला देत जागा ताब्यात घेतल्या जातील. यासाठी प्रशासनाला सहकार्य केले जाईल, असे दामले आणि चौधरी यांनी सांगितले.
