अशोक धोडी यांचा त्यांच्या गाडीत मृतदेह सापडला आहे. त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर मुलगा आकाश धोडी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी फरार आरोपी अविनाथ धोडी याच्या पत्नीला अटक करावी, अशी मागणी आकाश यांनी केली आहे.
आकाश धोडी यांची प्रतिक्रिया काय?
“अविनाश धोडी फरार आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक करावी. बाकीच्या आरोपींना चालता येणार नाही इतकं टॉर्चर करा. क्राईम ब्रांच आणि एसीबी यांना माझी विनंती आहे, आम्हाला न्याय द्या. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. नाहीतर त्यांच्यापासून आगामी काळात संपूर्ण गावाला, पालघर जिल्ह्याला धोका आहे. एवढी प्लॅनिंग करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज चुकवले आहेत”, अशी प्रतिक्रिया आकाश धोडी यांनी दिली.
आतापर्यंत काय-काय घडलं?
अशोक धोडी हे कामानिमित्त 19 जानेवारीला मुंबईत गेले होते. त्यानंतर धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. सगळीकडे पाहिल्यानंतरही अशोक धोडी यांचा शोध लागत नसल्याने अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणात अविनाश धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी हाच मुख्य संशयित आरोपी आहे. अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनीच अविनाश धोडी याच्यावर संशय व्यक्त केला. त्याच्या अवैध दारु तस्करीला अशोक धोडी यांचा विरोध होता. अशोक धोडी दारु तस्करीला अडचण ठरत असल्यानेच अविनाशने आपल्या मोठ्या भावाचं अपहरण केल्याचा कुटुंबियांना संशय होता.
या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती. तर 5 जण फरार होते. त्यांचा शोध सुरु होता. दुसरीकडे अशोक धोडी यांचादेखील शोध सुरु होता. पोलिसांना तपासा दरम्यान अशोक धोडी यांची कार झाई-बोरीहाव मार्गावर सीसीटीव्हीत कैद झालेली दिसली होती. पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आपला तपास पुढे नेला. अखेर ते भिलाड येथे बंद दगड खाणीपर्यंत जाऊन पोहोचले. इथेच अशोक धोडी यांचा त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळला.

