• Mon. Jan 27th, 2025

    वाल्मिक कराड सांभाळत असलेल्या परळीतील जगमित्र कार्यालयाची सूत्र अजय मुंडेंच्या हाती

    वाल्मिक कराड सांभाळत असलेल्या परळीतील जगमित्र कार्यालयाची सूत्र अजय मुंडेंच्या हाती

    Ajay Munde Parli: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत सतत वाढ होत आहे. तर, आता परळीतील जगमित्र कार्यालय जे वाल्मिक कराड सांभाळत होता त्याची सूत्र अजय मुंडे यांच्या हाती सोपवण्यात आले आहे.

    Lipi

    बीड: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनेक बड्या लोकांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आरोपींच्या फाशीची मागणी करण्यात येत आहे. त्याशिवाय, याप्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असाही आरोप केला जात आहे. तसेच, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. यादरम्यान आता परळीत मोठे बदल होताना दिसून येत आहे. परळीतील जगमित्र कार्यालयाची सूत्रे आता धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत.

    परळीतील जगमित्र याच कार्यालयातून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवत होता. वाल्मिक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे बसणार असून जगमित्र कार्यालयाची सूत्रे अजय मुंडे सांभाळणार आहेत.

    अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत. पिंपरी जिल्हा परिषद गटातून ते विजयी झाले होते. तर धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघात ते सक्रिय होते. सध्या वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत असताना जगमित्र कार्यालयाची सूत्रे कोण हाती घेणार हा प्रश्न होता. मात्र अजय मुंडे यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे.

    धनंजय मुंडे राज्याचे नेतृत्व करत असताना परळी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वाल्मिक कराड अग्रेसर होता. मात्र, मागील दीड महिन्यांपासून जगमित्र कार्यालय ओस पडले होते. आता अखेर याच कार्यालयाची सूत्रे अजय मुंडेंकडे आली आहेत.

    संतोष देशमुख अपहरण, खंडणी आणि हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. सध्या या प्रकरणात सीआयडीकडून वाल्मिक कराडची चौकशी सुरु असून त्याच्याविरोधात अनेक पुरावे, व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगही सापडले आहे. तर, दिवसेदिवस वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. पुण्यात त्याच्या अनेक मालमत्ता असल्याचंही समोर आलं आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed