GBS Patient: पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे रुग्ण वाढत असून, यासाठी तीन ते पाच लाखांचा खर्च येत आहे. त्यामुळे योजनेतील रक्कम वाढविण्याचा निर्णय राज्य आरोग्य हमी सोसायटीने घेतला आहे.
राज्य हमी सोसायटीने घेतलेल्या निर्णयानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. सुधारित निर्णयामुळे योजनेत ६० हजार, ८० हजार आणि दोन लाख असे तीन टप्पे करण्यात आले आहे. रुग्णांच्या प्रकृतीनुसार रक्कम खर्च केली जाणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘जीबीएस’च्या रुग्णांवर ‘प्लाझ्मा’ आणि ‘आयव्हीआयजी’ या पद्धतीने उपचार दिले जातात. ‘आयव्हीआयजी’ उपचारांमध्ये रुग्णाला ‘इम्युनोग्लोब्युलिन’ इंजेक्शनदेखील दिले जाते. काही रुग्णांना अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरवर उपचार द्यावे लागतात. त्यामुळे उपचारांचा खर्च वाढतो.
वडिलांच्या मृत्यूनंतर लाडक्या लेकीनेही घेतलं पेटवून; बापलेकीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, नाशिकमधील घटना
पुणे जिल्ह्यात ‘जीबीएस’च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने २२ जानेवारी रोजी विभागीय आयुक्त यांनी आरोग्य विभाग, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि संबंधित सर्व विभागांची बैठक घेतली होती. या बैठकीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रक्कम ८० हजारांहून वाढवून एक लाख ६० हजारापर्यंत करावी, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत पुण्यातील ससून, पिंपरी-चिंचवडमधील ‘वायसीएम’ या सरकारी रुग्णालयांबरोबरच दोन खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना योजनेत समाविष्ट करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचाराची रक्कम वाढविण्यात आली आहे. त्यानुसार सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांतील रुग्णांनाही लाभ देण्यात येत आहे. – डॉ. प्रीती लोखंडे, वरिष्ठ जिल्हा समन्वयक, ‘एमजेपीजेएवाय