Uday Samant News: उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतून परत आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे बुधवारी रात्री दावोस दौऱ्यानंतर मुंबईत परतले. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी गुरुवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील टीका केली. तर त्याचवेळी गेल्या काही दिवसांपासून सामंत यांच्यावर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देखील दिले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याच्या केलेल्या मागणीला सामंत यांनी समर्थन दर्शविले. शिवसेना उबाठाचे कोकणातील एक माजी आमदार शुक्रवारी रत्नागिरीत शिंदे गटात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.
यावेळी उदय सामंत म्हणाले की, दावोस दौऱ्यातील गुंतवणूक करारांवरून विरोधकांची टीका अनाठायी आहे. एखादे चांगले काम सुरू असताना खोटेनाटे आरोप करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविल्याचा दावाही सामंत यांनी केला. मुंबई किंवा महाराष्ट्रातीलच अनेक कंपन्यासोबत दावोसमध्ये करार करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना सामंत म्हणाले की, महाराष्ट्रातील एखादी कंपनी दावोस सारख्या जागतिक ठिकाणावरून गुंतवणुकीचे करार मदार करत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे, जागतिक पातळीवर आपल्या कंपन्या पोहचणे ही अभिमानाचीच बाब आहे असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांनी ऑपरेशन टायगरवर पुन्हा भाष्य केले.
ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, ते माझ्या नावाचा वापर करत आहेत, हे माझं मोठेपण आहे. असल्या बालिश पद्धतीने माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणीही फूट पाडू शकत नाहीत. मी दावोसला असताना ज्या लोकांनी माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, माझा राजकीय अस्त व्हावा यासाठी प्रयत्न केले त्यांच्या बाबत मी एवढेच सांगू इच्छितो की ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. वारंवार त्यांना कॉल करत आहेत. काल सुद्धा त्यांचा कॉल आला होता असा दावाही सामंत यांनी यावेळी केला.