Pimpri Crime : दारूच्या नशेत ‘टुथ अँड डेअर’ गेम खेळताना हा प्रकार झाला. हा प्रकार सुरू असताना पीडित मुलीचा फोन सुरू राहिला. मुलीच्या नात्यातील मुलाने हा सर्व प्रकार ऐकला आणि पीडितेच्या आई-वडिलांना माहिती दिली.
‘नीट’ची परिक्षा देण्यासाठी १७ वर्षीय मुलगी पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला होती. पिंपरीतील सोसायटीत भाड्याने रूम करून राहते. पाच वर्षांपूर्वी पीडित मुलीची आणि एका २२ वर्षीय तरुणीची ‘इन्स्ट्राग्राम’वर ओळख झाली. मंगळवारी (२१ जानेवारी) या तरुणीचा पीडितेला फोन आला. ‘मला घरातून बाहेर काढले आहे. राहण्यासाठी जागा मिळेल का,’ अशी विचारणा तिने केले. पीडित मुलीने एका दिवसासाठी तिला रूमवर बोलावले.
मंगळवारी संबंधित तरुणी पीडितेच्या रूमवर आली. मात्र, रात्री मित्राचा फोन आल्याने ती त्याच्यासोबत रावेत येथील फ्लॅटवर गेली. तेथे तिचा मित्र आणि त्याचे दोन साथीदार दारू पित होते. रात्री ११च्या सुमारास पीडित मुलीने मैत्रिणीला फोन करून, ‘तू कुठे आहेस, घरी ये, तुझी जबाबदारी माझ्यावर आहे,’ असे सांगितले. मात्र, तरुणीने प्रमाणाबाहेर दारूचे सेवन केले होते. त्यामुळे ‘तुला माझी काळजी असेल, तर तूच इकडे ये,’ असे तिने सांगितले. तरुणीचे इतर दोन मित्र अल्पवयीन मुलीला आणण्यासाठी गेले. कारमधून ते रावेत येथील फ्लॅटवर आले. तेथे गेल्यावर तरुणीने अल्पवयीन मुलीला दारू पिण्याचा आग्रह केला. यामुळे अल्पवयीन मुलगीही दारू प्यायली. पीडित अल्पवयीन तरुणी, तिची मैत्रीण, मैत्रिणीचा मित्र आणि मित्राचे दोन मित्र असे पाच जण दारू प्यायले. दारूची झिंग चढल्यानंतर त्यांनी ‘टूथ अँड डेअर’ गेम खेळायचे ठरवले. या गेममध्ये जो हरेल त्याने समोरचा सांगेल ते करायचे असते. या गेममध्ये पीडितेची मैत्रीण हरली.
■ बाथरूममध्ये बलात्कार
‘टूथ अँड डेअर’ गेम सुरू असताना मैत्रिणीला उलटी झाली. दोन मित्रांनी धरून तिला बाथरूममध्ये नेले. त्याच वेळी पीडित मुलगी दुसऱ्या बाथरूममध्ये गेली. तिच्यामागे दारूच्या नशेतील मैत्रिणीचा मित्र आला. तेथे त्याने पीडितेवर बलात्कार केला. त्याच वेळी पीडित मुलीच्या मोबाइलमधून तिच्या प्रियकराला फोन लागला. दोघांमधील संभाषण फोनवर त्याने ऐकले.
■ आई-वडिलांनी नोंदविली तक्रार
पीडित मुलीच्या प्रियकराने तिच्या आई-वडिलांना फोन केल्यावर त्यांनी मुलीचे लोकेशन घेतले. ‘तू रावेत येथे कशाला गेली होती, नक्की काय झाले,’ अशी विचारणा केली. मुलगी घाबरल्याने तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ते मुलीला घेऊन पिंपरी पोलिस ठाण्यात आले. तेथून रावेत पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविला. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.