Sonam Wangchuck Advice on Environmental Issue : सरकार जनतेवर प्रकल्प लादत नाही. तर जनतेला जे हवे आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारकडून विविध प्रकल्प उभारले जातात. आता सरकारला नाही तर लोकांना बदलवा, सरकार आपोआप बदलेल, असे आवाहन सोनम वांगचुक यांनी केले आहे.
आईटी पार्क मार्ग येथील परसिस्टंट सिस्टम कंपनीच्या एबीजे अब्दुल कलाम सभागृहात आयोजित कार्यक्रमात वांगचुक यांनी पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरणाला होत असलेल्या धोक्यांची माहिती करून देत नागरिकांना अधिक जागरूक होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ग्रीन नागपूर, ग्रीन लिडर्स, फ्रेंड्स ऑफ लडाख आणि फ्रेंड ऑफ नेचर, स्वच्छ असोसिएशन या संस्थांच्या पुढाकारने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनसूया काळे, कुणाल मौर्य, जयदीप दास, अक्षिता व्यास आदी उपस्थित होते.
वेगवेगळे प्रकल्प सरकारकडून येत आहेत. मात्र जनता मालक आहे. अल्लादीन जीनकडे जे मागतो ते तो त्याला उपलब्ध करून देतो. इथे जनता अल्लादीन आहे आणि सरकार जीन आहे. पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही असेच जनतेने मागायला हवे. त्यामुळे सरकारला नाही तर स्वत:ला दोष द्या. लोकशाहीच्या आयुधांचा वापर करून लोकचळळ उभी करा, असा सल्लाही वांगचुक यांनी दिला. पैशांमुळे आनंद मिळतो मात्र तो एका ठिकाणी स्थित होऊन आनंदाचा ग्राफ नंतर कमी कमी होत जातो, असे वांगचुक म्हणाले. प्रीती पटेल यांनी सूत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, वांगचूक यांनी रविवारी सकाळी मानकापूर क्रीडा संकुल परिसरात पर्यावरण प्रेमींसोबत विविध विषयांवर चर्चा करत ‘नेचर वॉक’ केला. शहरी वन यात्रा असा हा उपक्रम राबविण्यात आला.
‘सिमेंट नको माती वापरा’
सिमेंटची घरे पर्यावरण पूरक नाही. सिमेंटचा वापर पूर्णपणे बंद करा, असे नाही मात्र सिमेंटची गरज केवळ २० टक्केच आहे. उड्डाणपूल आणि बहुमजली इमारत उभी करण्यासाठी सिमेंट लागते. मात्र घर उभे करण्यासाठी मातीचा वापरच उत्तम आहे. यात अधिकाधिक संशोधन करून चांगली घरे निर्माण होऊ शकतात. मात्र सहज उपलब्ध असणाऱ्या मातीकडे कुणाचेच लक्ष नाही, अशी खंत वांगचुक यांनी व्यक्त केली. लडाखमधील नैसर्गिक परिस्थितीला तोंड देत तिथे पूर्वजांनी कशापद्धतीने हिरवळ तयार केली, याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमखंड वितळत असून त्यामुळे गंगेसारख्या मोठमोठ्या नद्या कोरड्या पडतील असा धोकाही त्यांनी वर्तविला.