केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी १९७८ पासून दगाफटक्याचं राजकारण सुरू केल्याचे शहा म्हणाले. उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये विचारधारा सोडून खोटं बोलून मुख्यमंत्री पद मिळवल्याचं ते म्हणाले. भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या तयारीत असल्याचे शहा म्हणाले.
भारत माता की जय इतक्या मोठ्या आवाजाने घोषणा द्या की हा आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी व्हायचं आहे. खऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही विजय मिळवला आहे. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं तेसुद्धा जमिनीमध्ये गाडण्याचं काम जनतेने केलं आहे. उद्धव ठाकरेंनी २०१९ ला विचारधारा सोडून दगा देत खोटं बोलून मुख्यमंत्री झाले होते त्यांनाही लोकांना जागा दाखवून दिली आहे. १९७८ पासून २०२४ पर्यंत अस्थिर राजकारण संपवत स्थिर फडणवीस सरकार देण्याचं काम केलं आहे. लोकसभेनंतर महाराष्ट्रातही विजय होईल विरोधकांच्या या स्वप्नाला धुळीस मिळवलं आहे. अनेक निवडणुका अशा असतात की देशाचं राजकारण बदलतात. माझे शब्द लक्षात ठेवा २५ वर्षांनी इतिहास साक्षी असेल महाराष्ट्रातील महाविजयाने देशाच्या राजकारणाची गाडी पुन्हा रूळावर आणण्याचं काम केलं आहे.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांचे विशेष आभार. उत्तर महाराष्ट्रात २२ पैकी २१ जागा, कोकणमध्ये १७ पैकी १६, पश्चिम महाराष्ट्राध्ये २६ पैकी २४, पश्चिम विदर्भामध्ये १७ पैकी १५, पूर्व विदर्भामध्ये २९ पैकी २२, मराठवाड्यामध्ये २० पैकी १९ आणि मुंबईमध्ये १७ पैकी १५ जागांवर विजय महायुतीने विजय मिळवल्याचं सांगत अमित शहांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार इतकी वर्षे शेतकऱ्यांचे नेते राहिले, मुख्यमंंत्री होऊन गेले पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत. भाजप सरकार प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, असंही शहा म्हणाले.