• Mon. Jan 13th, 2025

    वाल्मिक कराडचा आणखी एक उद्योग समोर, 11 कोटी 20 लाखांना गंडा, धनुभाऊंनाही ठरणार अडचणीचं, नेमकं काय प्रकरण?

    वाल्मिक कराडचा आणखी एक उद्योग समोर, 11 कोटी 20 लाखांना गंडा, धनुभाऊंनाही ठरणार अडचणीचं, नेमकं काय प्रकरण?

    Walmik karad Marathi News : संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. कराड याचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात आहे. कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्यामुळेत त्यांचीही अडचण होत आहे. या प्रकरणादरम्यान कराडचा आणखीन एक उद्योग समोर आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सुनील दिवाण, पंढरपूर : संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेल्या वाल्मिक कराड याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. वाल्मिक कराड याने ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीन मालकांना 11 कोटी 20 लाखांची टोपी घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पंढरपूर परिसरातील फसवणूक झालेल्या 19 मशीन मालक शेतकऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले असून त्यांच्या कडून तक्रारी अर्ज दाखल केले आहेत. आता या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होणार असून या 11 कोटी 20 लाखाची फसवणूक झालेल्या सर्व मशीन धारकांना त्यांच्या जवळील पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. यातील तथ्य तपासून पुढील दोन दिवसात वाल्मीक कराड जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

    ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या राज्यातील जवळपास 140 शेतकरी मशीन धारकांना 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मीक कराड आणि त्यांच्या सहकार्याने प्रत्येकी आठ लाख रुपये देण्यास सांगितले होते. तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपले निकटवर्ती असून आम्ही तुम्हाला या अनुदान मिळवून देतो असे सांगत या सर्व 140 जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे. यासाठी 14 सप्टेंबर 2024 रोजी धनंजय मुंडे यांची वाल्मीक कराड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घडवून आणल्याचा गोपी स्फोटही या तक्रारदारांनी केला आहे. यावेळी मुंडेंनीही आश्वासन दिल्याचा दावा या शेतकऱ्यांचा आहे. पालघर येथील एका हॉटेलमध्ये पैसे मोजून देताना चे फोटो आणि मुंडे यांच्या भेटीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. यातील एका फोटोत जितेंद्र पालवे हा पैसे मोजून घेताना दिसत असल्याचा दावा तक्रारदारांचा आहे. या तक्रारदारांकडे प्रत्येक नोटीचे नंबर आणि व्हिडिओ देखील असून अनेकांनी कर्ज काढून आणि सावकाराच्या माध्यमातून हे पैसे उभा केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

    दरम्यान पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष हुंबे यांनी श्रीकांत नागणे दिलीप नागणे यांच्यासह 19 जणांचे जबाब काल रात्री उशिरा नोंदवले आहेत. या सर्वांचे तक्रारी अर्ज देखील पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले असून येत्या दोन दिवसात सर्व पुरावे सादर करण्याची सूचना पोलिसांनी या शेतकऱ्यांना दिलेली आहे. सर्व पुरावे आणि तथ्य समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल असे पोलिसांचे सांगणे असून आता हे सर्व फसवणूक झालेले शेतकरी पुरावे गोळा करायला लागले आहे. विशेष म्हणजे सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो देखील सध्या व्हायरल झाले असून पैसे देतानाचा एक फोटोही समोर आला आहे.

    हार्वेस्टिंग मशीन साधारण एक कोटी रुपयाची असून यासाठी पूर्वी अनुदान मिळत होते. मात्र नंतरच्या काळात हे अनुदान बंद होऊ नये कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. आता या सर्व शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल केला असून राज्यातील विविध भागातील हे तक्रारदार असल्याने आता राज्यात अनेक ठिकाणी हे तक्रारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल. या प्रकाराची व्याप्ती मोठी असून या त अनेक जण सामील असल्याने याचा वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्र्यांनी तपास करावा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांनी आमदार सुरेश धस आणि मनोज दादा जरांगे यांच्याही कानावर हा सर्व प्रकार घातला असून आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed