• Sun. Jan 12th, 2025

    राजमाता जिजाऊ यांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते महापुजा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 12, 2025
    राजमाता जिजाऊ यांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते महापुजा – महासंवाद

    बुलडाणा,(जिमाका) दि.12: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस असून त्यांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथील जन्मस्थळी ‘राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सुर्योदयावेळी शासकीय महापुजा करण्यात आली.

    पुरातत्व विभाग, नागपूर, सिंदखेड राजा नगरपरिषद आणि मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव, माजी आमदार डॅा. राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सदाशीव शेलार, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसिलदार, मुख्याधिकारी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेवून अभिवादन केले.

     

    महापुजा पार पडल्यानंतर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, सिंदखेड राजा नगरीमध्ये राजमाता जिजाऊ यांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या जन्मोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे देशभरातून लाखो लोक राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी येत असतात. मॅा जिजाऊ साहेब यांच्या रुपाने सिंदखेड राजा नगरीला आदर्श माता, पूत्र घडविणारी राष्ट्रमातेची नगरी म्हणून जगभरात दर्जा प्राप्त झाल्याचे सांगून राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

    राजमाता जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

    राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते शासकीय पुजा करण्यात आली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव हे महाराष्ट्रातील भक्तांसाठी दर्शनाची वर्षभराची शिदोरी असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्शन घेण्यासाठी आलो. राजमाता जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहोत. लखुजीराजे जाधव राजवाडा या मॅा जिजाऊ जन्मस्थळासंदर्भातील विकास कामांमधील अडचणी दूर करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापुजा करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात येईल. सिंदखेड राजा विकास आराखड्याला गती देण्यात येईल, असे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

    विद्युत रोषणाई, फुलांच्या माळांनी सजले मातृतीर्थ

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला होता. दरवर्षीप्रमाणे या जन्मस्थळी मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेला लखुजीराजे जाधव यांचा राजवाड्याची आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती.

    शाळकरी विद्यार्थांमध्येही उत्साह

    राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात हजारो जिजाऊप्रेमींची गर्दी होती. या सोहळ्यात शाळकरी मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला होता. यावेळी मॅा जिजाऊ जन्मोत्सवाचा शाळकरी विद्यार्थांमध्येही उत्साह दिसून येत होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed