• Sat. Jan 11th, 2025

    ‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरणाच्या कामांची गुणवत्ता राखत गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 11, 2025
    ‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरणाच्या कामांची गुणवत्ता राखत गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश – महासंवाद

    • कालमर्यादेत गुणवत्तापूर्ण प्रकल्पपूर्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम 

    • एप्रिल महिन्यात पुन्हा आढावा घेणार

      नागपूर, दि.11:  शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे रुग्णांची संख्या व रुग्णालयाप्रति विश्वासार्हता अधिक आहे. येथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये निधी येथील कामांना उपलब्ध करून दिला आहे. ही कामे दिलेल्या कालमर्यादेत व आराखड्यानुसार पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

    नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला.

    यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, आशीष देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, , वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. राज गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    देखरेखीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम

    ‘मेयो’ आणि ‘मेडिकल’मधील प्रगतिपथावरील कामे, सद्यस्थिती, अडी-अडचणी, कामाची गुणवत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले.

    सौर ऊर्जेवर भर द्या

    ‘मेयो’ आणि ‘मेडिकल’मधील वीजेची गरज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली पाहिजे. संपूर्ण कॅम्पस परिसर हा सौर ऊर्जेवर असावा , यावर भर देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

    जुनी कामे पूर्ण केल्यावरच नवीन सुरू करा

    ‘मेडिकल’ आणि ‘मेयो’मधील सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण करावी. त्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मेडिकल व मेयोमध्ये अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देण्यात यावा, असेही ते म्हणाले. मेडिकल व मेयोमध्ये उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारतींच्या प्रसाधनगृहांची देखभाल ही योग्य प्रकारे व्हावी यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

    एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आढावा

    ‘मेडिकल’ आणि ‘मेयो’मधील सुरू असलेली कामे दिशानिर्देशानंतर किती पूर्ण झाली याचा आढावा एप्रिल महिन्यात पुन्हा घेण्यात येणार आहे. यावेळी कामाच्या सद्यस्थितीची माहिती प्राधान्याने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed