• Fri. Jan 10th, 2025

    Pune Crime : डोणजेमधील खडकवासला धरणाजवळ बॉडीचे तुकडे, गावातल्यानेच केलेला पोळेकरांचा गेम, मोठी माहिती समोर

    Pune Crime : डोणजेमधील खडकवासला धरणाजवळ बॉडीचे तुकडे, गावातल्यानेच केलेला पोळेकरांचा गेम, मोठी माहिती समोर

    Pune Crime News : पुण्यातील डोणजे गावचे व्यावसायिक विठ्ठल पोळेकरांच्या खून प्रकरणामधील मुख्य आरोपीला अटक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या या हत्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली होती. या हत्येमागचं कारण समोर आलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. प्रतिनिधी, पुणे : बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून खून करणारा मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे याने पोळेकरांना मिळालेल्या रस्त्याच्या कंत्राटी कामात अडथळे न आणण्यासाठी त्यांच्या मुलाकडे ‘इनोव्हा’ व ‘जग्वार’ कारची मागणी केली होती; परंतु पोळेकरांच्या मुलाने कार देऊ शकत नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी दोन कोटी रुपये खंडणी मागून पोळेकरांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोळेकरांच्या मुलाने खंडणीची रक्कम न दिल्याने आरोपींनी पाळत ठेवून पोळेकर पिता-पुत्राचे अपहरण करण्याचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

    विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०, रा. पोळेकरवाडी, डोणजे) यांचा खून केल्यावर दोन महिन्यांपासून पसार असलेला मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे (वय ३२) याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोल्हापूर येथून अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले. या प्रकरणात पूर्वी रोहित किसन भामे (वय २२, दोघे रा. डोणजे), मिलिंद देविदास थोरात (वय २४, रा. वाघोली, मूळ रा. बेलगाव, कर्जत), शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. वाघोली, मूळ रा. खळवाडी, अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. याबाबत, पोळेकरांच्या मुलीने हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पोळेकरवाडी येथे सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर घडली होती.

    विठ्ठल पोळेकर सरकारी कंत्राटदार असल्याने, त्यांना दोन वर्षांपूर्वी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचे कंत्राट मिळाले होते. मुलगा प्रशांत मदत करायचा. आरोपी योगेश भामेने रस्त्याच्या कामात अडथळे न आणण्यासाठी प्रशांत पोळेकरला दमदाटी करून प्रथम ‘इनोव्हा’ व नंतर ‘जग्वार’ कार मागितली; परंतु कार देण्यास टाळाटाळ केल्याने आरोपींनी खंडणीसाठी प्रशांत पोळेकरचे अपहरण करण्याचा कट रचला. ११ नोव्हेंबर रोजी पोळेकरांच्या कार्यालयात जाऊन ‘जग्वार’ कारची मागणी केली. कार देऊ शकत नसल्याचे सांगितल्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम न मिळाल्याने विठ्ठल पोळेकरांचे अपहरण करून खून केला. मृतदेहाचे तुकडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकल्याचे न्यायालयात सांगितले.

    आरोपीतर्फे ॲड. दादासाहेब भोईटे यांनी बाजू मांडली. ‘आरोपी संबंधित ग्रामपंचायतीचा सदस्य असून, पोळेकरांना मिळालेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत त्याने आंदोलन केले होते. या रस्त्याची निविदा ७० लाख रुपयांची असताना, ‘जग्वार’ अथवा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप राजकीय आकसापोटी केला आहे,’ असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने आरोपीला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed