अमरावती शहर हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती शहरात झाली आहे. असं असलं तरी आगामी काळात विदर्भात वादळी पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं आहे? ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : राज्यात जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा चढलेला बघायला मिळतोय. अनेक शहरांमध्ये उन्हामुळे सर्वसामान्यांची लाही-लाही होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे, नंदूरबार यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड कडाक्याचं ऊन पडताना दिसत आहे. हीच परिस्थिती विदर्भात देखील आहे. विशेष म्हणजे अमरावती हे देशातील सर्वात उष्ण शहर असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाच्या तीव्र झळा बघायला मिळत आहे. मार्च महिन्यातच अशी अवस्था असेल तर एप्रिल आणि मे महिन्यात किती ऊन पडेल? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या दरम्यान हवामान विभागाने आगामी काळात विदर्भात वादळी पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे.
यंदा मार्च महिन्यातच विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो आहे. गुरूवारी (१२ मार्च) अमरावती येथे ४२.२ अंश तर अकोला येथे ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती हे गुरुवारी देशातील सर्वाधिक तर जगभरातील १५ व्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. यातील अमरावती आणि अकोला या दोन्ही शहरांमध्ये सरासरीपेक्षा अनुक्रमे ६.८ आणि ५.३ अंशांनी अधिक तापमान नोंदविले गेले असल्याने येथे उष्णतेची लाट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमानात मोठी वाढ झाली आहे. यात ब्रह्मपुरी येथे ४०.८, चंद्रपूर आणि वर्धा येथे प्रत्येकी ४०.२ अंश तर यवतमाळ येथे ४० इतके तापमान होते. त्यामुळे विदर्भातील ११ पैकी निम्म्याहून अधिक जिल्ह्यांत तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होते. याखेरीज नागपूरमध्ये ३९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी अधिक असल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. भंडारा आणि गोंदिया येथे तुलनेने सगळ्यात कमी प्रत्येकी ३८ इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. फेब्रुवारीअखेर झालेल्या अवकाळी पावसानंतर काही दिवस गारवा होता; मात्र मार्च सुरू होताच वातावरण कोरडे झाले आहे.
विदर्भात वादळी पावसाची शक्यता
यानंतर आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. यात शुक्रवारी चंद्रपूर आणि यवतमाळ येथे तर शनिवार ते सोमवार या काळात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत विदर्भातील तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा