• Sat. Mar 14th, 2026
    Raigad ZP : रायगडच्या राजकारणात नवा इतिहास; भाजपचे मंगेश वाकडीकर पहिले अध्यक्ष

    रायगडच्या राजकारणात नव्या ऐतिहासिक घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच भाजपचे अध्यक्ष विराजमान झाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेत महायुतीने सत्ता स्थापन करत राजकारणात नवा इतिहास घडवला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष निवडून आल्याने या निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या फॉर्म्युल्याला यश मिळाल्याने जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता निश्चित झाली आहे.

    रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात गुरुवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी केळवणे जिल्हा परिषद गटाचे मंगेश वाकडीकर यांनी तर उपाध्यक्षपदासाठी वरसे गटाचे मधुकर पाटील यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हे अर्ज पीठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याकडे सादर करण्यात आले. दोन्ही पदांसाठी अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने वाकडीकर आणि पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

    या निवड प्रक्रियेदरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार अनिकेत पाटील, माजी खासदार तथा भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजप गटनेते वैकुंठ पाटील, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या गटनेत्या मानसी दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आस्वाद पाटील, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

    रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. या निवडणुकीत भाजपला १५, राष्ट्रवादी काँग्रेसला १६, शिवसेना शिंदे गटाला २१, शिवसेना ठाकरे गटाला ५ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. मात्र निवडणूकपूर्व युतीमुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत बहुमताचा आकडा गाठला. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आणि पुढे शिवसेना गटही महायुतीसोबत सहभागी झाल्याने जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन झाली.

    अध्यक्षपद भाजपकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचा फॉर्म्युला वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार भाजपने अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर यांना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसने उपाध्यक्षपदासाठी मधुकर पाटील यांच्यावर विश्वास दाखवला. या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने महायुतीच्या एकजुटीचे चित्र स्पष्ट झाले.

    दुपारी दोन वाजता झालेल्या सभेत पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांनी अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे त्यांच्या दालनात स्वागत केले. यावेळी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते अनुपस्थित असल्याने सभागृहात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. तरीही जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्याने आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा