• Fri. Jan 10th, 2025

    शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्यानं टोरेसमध्ये ४ कोटी गुंतवले; पैसे आले कुठून? स्वत:चं सांगितलं

    शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्यानं टोरेसमध्ये ४ कोटी गुंतवले; पैसे आले कुठून? स्वत:चं सांगितलं

    Torres Scam: टोरेस कंपनीनं शहरातील हजारो गुंतवणूकदारांना चुना लावला आहे. प्रदीपकुमार वैश्य यांचे साडे चार कोटी रुपये यामध्ये बुडाले आहेत. ते भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: टोरेस कंपनीनं शहरातील हजारो गुंतवणूकदारांना चुना लावला आहे. प्रदीपकुमार वैश्य यांचे साडे चार कोटी रुपये यामध्ये बुडाले आहेत. ते भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात. शेजारणीच्या सांगण्यावरुन त्यांनी टोरेसच्या स्कीममध्ये ४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता पैसे बुडाल्यानं ते हवालदिल झाले आहेत.

    टोरेसच्या स्कीममध्ये किती पैसे गुंतवले, इतकी मोठी रक्कम कुठून आणली, त्याबद्दल प्रदीपकुमार वैश्य यांनी सविस्तर सांगितलं. ‘३० डिसेंबरपासून पेमेंट येणं बंद झालं. त्याबद्दल विचारणा केली असता, नववर्ष असल्यानं बँकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे पेमेंट आलं नाही. पुढच्या आठवड्यात दोन्ही पेमेंट येतील, असं सांगण्यात आलं होतं. सचिन शर्मानं फ्लोअरला येऊन बोनस, गुंतवणुकीवरील पेमेंट मिळेल, असं आश्वासन दिलं होतं. तांत्रिक कारणं, नववर्ष, बँकांना सुट्टी यांचा उल्लेख असलेलं पत्रकदेखील कार्यालयाबाहेर लावण्यात आलं होतं,’ असं वैश्य यांनी सांगितलं.
    स्टील कारखान्यात निर्माणाधीन चिमणी कोसळली; ३० हून अधिक मजूर अडकले; ४ जणांचा मृत्यू
    ‘टोरेस कंपनी ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरु झाली. मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं. त्या दिवशी आम्ही तिकडे गेलो होतो. तिकडे बरेच सेलिब्रिटी आले होते. मालिकेत काम करणारे कलाकार उपस्थित होते. मोठी कंपनी असल्यानं त्यात फारसा रस घेतला नाही. आमच्या शेजारी एक महिला राहते. तिच्या सांगण्यावरुन मी टोरेसमध्ये पैसे गुंतवले,’ असं वैश्य म्हणाले.

    ‘एक लाख रुपये गुंतवल्यास दर आठवड्याला ६ हजार रुपये मिळतील. तुमचे पैसे बुडणार नाहीत, असं तिनं सांगितलं. पण तरीही मी तीन महिने थांबलो. त्या महिलेच्या खात्यात ३ महिने पैसे जमा झाले. त्यानंतर मग मीदेखील पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. २१ जूनला शेजारच्या महिलेसोबत जाऊन ६ लाख ७० हजारांची गुंतवणूक केली. त्यावर ४० हजार २०० रुपये व्याज मिळायचं. चार, पाच हप्ते नीट आले. त्यामुळे कंपनीवरील विश्वास वाढला,’ अशा शब्दांत वैश्य यांनी घटनाक्रम कथन केला.
    काहीतरी गडबड वाटतेय! ग्राम पंचायत सदस्याचा पोलिसांना फोन; बंद घराची झडती, फ्रिज उघडला अन्..
    ‘कंपनीची दुसरी शाखा गिरगावात सुरु झाली. गुंतवलेला पैसा कुठे जातो ते कळत नव्हतं. इंटरनेटवर सर्च केल्यावर सुर्वेचं नाव यायचं, प्लॅटिनम हर्नचं नाव यायचं. यात चेन सिस्टिम होती. लकी ड्रॉ काढण्यात यायचा. भेटवस्तू दिल्या जायच्या. मी ३० ते ४० जणांना जोडलं. जवळपास ४ कोटींची रक्कम गुंतवली. दुसऱ्या लोकांच्या नावावर पैसे टाकले. आता लोक पैसे मागण्यास येत आहेत. मी एक साधा लिंबू व्यापारी आहे. मी त्यांना पैसे कसे देणार,’ असा सवाल करत त्यानं हतबलता व्यक्त केली.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed