Mumbai Girl Student Ends Life At School: मुंबईतील एका मोठ्या आणि प्रसिद्ध शाळेत ११ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेत आपली जीवन यात्रा संपवली आहे.
ही विद्यार्थिनी ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकराव्या वर्गात शिकत होती. गुरुवारी ती नेमहीप्रमाणे शाळेत गेली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ती बाथरुममध्ये गेली. तिथे तिने आपल्या बुटांच्या लेसच्या सहाय्याने स्वत:ला गळफास लावून घेतला. या घटनेने शाळेत एक खळबळ माजली आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आबे. तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने बाथरुममध्ये गळफास लावून घेतला. याप्रकरणी एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी असेही नमूद केले आहे की पालक किंवा शाळेने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू ठेवला आहे.
शाळेने त्याचे प्रमुख पॅट्रिक हर्वर्थ यांचे एक निवेदन प्रसिद्ध केले आहे की, “मला हे वृत्त देताना अत्यंत वेदना होत आहेत की, आज सकाळी ११वीच्या आमच्या एका विद्यार्थिनीचे निधन झाले. मी अधिक तपशील सांगू शकत नाही आणि मी तुमच्याकडून समजुतदारपणाच्या वागणुकीची अपेक्षा करतो, या शोकांतिकेचा सामना करताना कुटुंबाच्या गोपनीयतेबद्दल आदर ठेवावा, आपण शांतपूर्ण मार्गाने एक समुदाय म्हणून एकत्र येऊ या आणि त्या कुटुंबाला आधार देऊ.”
“मी शक्य तितक्या लवकर पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन, तुमच्याबरोबर संसाधने सामायिक करेन जेणेकरून तुम्ही तुमच्या मुली आणि मुलांना घरी आधार देऊ शकाल.” उद्यापासून कॅम्पसमध्ये समुपदेशन सुविधा सुरू करण्याचे आश्वासनही शाळेने दिले आहे. तसेच पालकांना त्यांच्या मुलांच्या भावना कशा हाताळायच्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी एॅडव्हायजरीही पाठवली गेली आहे.