बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ, घुई गावांमधील टक्कल पडलेल्या व्यक्तींची संख्या ५१ वर पोहोचल्यानं पंचक्रोशीत खळबळ उडाली.
बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ, घुई तालुक्यातील पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. पाण्यात नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याची माहिती तपासणीतून पुढे आली आहे. ‘जिथे टक्कल पडण्याची समस्या निर्माण झाली, तो खारपाण पट्टा आहेच. त्यामुळे आम्ही तपासण्या केल्या. इथल्या पाण्यात नायट्रेट, आर्सेनिक, लीडचं प्रमाण जास्त असावं अशी शंका त्वचा तज्ज्ञांना आली. त्यामुळे पाण्याचे नमुने तपासणीसाठी खामगावमधील लॅबमध्ये पाठवण्यात आले,’ अशी माहिती बुलढाण्याचे आरोग्य अधिकारी अमोल गितेंनी दिली.
‘त्वचा तज्ज्ञांना शंका आल्यानं पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातल्या नायट्रेट, आर्सेनिक, लीडचं प्रमाण तपासण्यात आलं. नायट्रेटचं प्रमाण १० च्या आत असायला हवं. पण तिथल्या प्रमाणात हे प्रमाण तब्बल ५४ मिलिग्रॅम पर लीटर म्हणजेच पाचपट आहे. याशिवाय टीडीएसदेखील २१०० आहे. केमिकल दूषित पाणी असल्यानं तिथे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत,’ असं गितेंनी सांगितलं.
भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोंडगाव येथे गावातील महिला, पुरुष, लहान मुलामुलींचे केस गळत असल्याचा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली. गावातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेंगोळे, बोडगावचे सरपंच रामेश्वर धारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. नंतर ग्राम कठोरा येथे केस गळती झालेल्या रुग्णांचं सर्वेक्षण करून आरोग्य प्रशिक्षण देण्यात आलं. उपस्थित डॉक्टर राठोड, डॉक्टर ढोबळे यांनी केस गळती संदर्भात गावकऱ्यांच्या शंका कुशंकाचं निराकरण केलं.