• Tue. Jan 7th, 2025

    ‘आपलं सरकार’ वेब पोर्टल नव्या स्वरूपात उपलब्ध करा- मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 6, 2025
    ‘आपलं सरकार’ वेब पोर्टल नव्या स्वरूपात उपलब्ध करा- मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद




    मुंबई, दि. ०६: महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे ‘आपलं सरकार’ (1.0) वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करावे. त्याचबरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे ‘ॲप’ तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

     

    माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक सपना कपूर, महाआयटीचे प्रकल्प अधिकारी राहुल सुर्वे, महाआयटीचे प्रकल्प अधिकारी किरण पाटील यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, आपलं सरकार ही वेबसाईट अपग्रेड करुन नव तंत्रज्ञानाचा वापर करुन वेबसाईट नव्या स्वरूपात तयार करण्यात यावी. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होतील, तसेच कोणत्याही सेवा सुविधेसाठी अर्ज करताना वेबसाईट वापरण्याची पद्धत सुलभ असायला हवी, अधिक क्षमतेचा रॅम वापरून चॅट बॉट सारख्या सुविधांसह  एआय (कृत्रिम बुद्धीमत्तेचा) चा वापर करुन  त्या वेबसाईट वापरण्यास सुलभ बनवाव्यात. तसेच आपलं सरकारचे एक ॲप तयार करुन  सुविधा ॲपवरुन उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

    महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा नागरिकांना आपलं सरकार वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अन्य राज्यांचा यासंदर्भातील अभ्यास करुन महाराष्ट्र शासनाच्या 485 व्यतिरिक्त 285 अधिकच्या नवीन सेवा ऑनलाईन देण्याची तयारी केली असून लवकरच या सुविधा उपलब्ध होतील. यावर महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि महाआयटी कंपनी काम करीत आहे. या सेवा कार्यान्वित झाल्यानंतर 770 सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील ऑनलाईन सेवा देणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये येईल. या दृष्टीने विभागाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

    केंद्र सरकारने डेटा सुरक्षेसाठी तयार केलेल्या कायद्यानुसार राज्याचा ‘स्टेट ओन क्लाउड’ तयार करण्याचे निर्देशही मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

    ०००

    संध्या गरवारे/विसंअ/

     

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed