मुंबई,दि. ०६: वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.
ग्रंथालय संचालनालयांतर्गत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबईच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत समूह वाचन, ग्रंथप्रदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा, ग्रंथपरिक्षण व कथन, व्यवसाय मार्गदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा पार पडली.
यावेळी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथालय उपसंचालक श्री.काकड, यंग लेडीज हायस्कूलच्या शिक्षिका उषा वर्मा, सुजाता महाजन, वर्षा शिंदे यांच्यासह विद्यार्थीनी, वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. श्री. गाडेकर यांनी वाचन कार्यशाळेचे उद्घाटन करून वाचनाचे महत्त्व सांगून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. शामकुमार पां. देशमुख, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांनी मार्गदर्शन केले. वाचन म्हणजे काय, त्याचे फायदे, काय वाचावे? वाचण्याच्या विविध पद्धतीचे सविस्तर विवेचन केले. वाचनाने मनाची ताकद, आकलन क्षमता, वैचारीक पातळी वाढते. वाचनाचे मुलभूत अंग या प्रसंगी विशद करण्यात आले. वाचनाचे चार स्तर असून प्रत्येक स्तरावर आपल्या वैचारीक पातळीत बदल होतो. वाचनाची सवय लावण्यासाठी दररोज आवडीच्या विषयावर किमान 20 मिनिटे वाचन करण्याचे स्वत:ला बंधन घातले पाहिजे, असेही त्यांनी उपस्थित वाचक आणि विद्यार्थ्यांना सांगितले.
राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबईचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी योगेश बिर्जे यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/